सहभागात वाढ ; पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम
रत्नागिरी:- ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८४६ पैकी १०५ ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. दरवर्षी ग्रामपंचायतींचा सहभाग वाढत असून दोन वर्षांपुर्वी अवघ्या सहाच ग्रामपंचायतींचा सहभाग होता. या अभियानातून पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जातात.
स्थानिक स्वराज्य संस्थानी वृक्षारोपण अभियान, घनकचर्याचे संकलन, साचलेल्या कचर्यावर प्रक्रिया प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, रस्त्यांच्या बाजूला हरितीकरण करणे, जलसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबवणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी, नाले, तळ्यांचे पुन:र्जिवीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, मैला व्यवस्थापन व प्रक्रिया करणे याचबरोबर सौरउर्जेवरील चालणारे दिवे, बायोगॅस प्रकल्पाची उभारणी आदी पर्यावरणाशी संबंधीत आधारावर उपाययोजना करत शाश्वत निसर्गपूरक जीवन पद्धती अवलंबण्यासाठी हे अभियान ग्रामपंचायतीअंतर्गत सुरू करण्यात आले आहे. या अभियानात ५ हजारापासून १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांनाही सहभाग घेता येणार आहे. या अभियानासाठी एकूण ७ हजार ५०० गुण ठेवण्यात आले आहेत. यामध्ये भूमिगट, वायू, जल, अग्नी, आकाश गटासाठी गुण दिले जाणार आहेत. यामध्ये हरित अच्छादन आणि जैवविविधता, रेन वॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापन, ई- कचरा व्यवस्थापन, वृक्ष गणना व जिओ टॅगिंग, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन यासारख्या पर्यावरण समतोल राखण्यासाठी केलेल्या विविध कामांची दखल घेवून गुणांकन केले जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींना लाखो रुपयांची बक्षिस दिली जाणार आहेत.
दरम्यान, माझी वसुंधरा अभियान सुरु झाल्यानंतर पहिल्या वर्षी अवघ्या सहाच ग्रामपंचायतींनी नोंदणी केली होती. त्यानंतर दुसर्या वर्षी ७५ ग्रामपंचायतींचा समावेश झाला. यावर्षी भर पडली असून भविष्यात त्याच तुलनेत मोठी वाढ होईल अशी अपेक्षा जिल्हा परिषद प्रशासनाकडून केली जात आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा सहभाग कमी आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाकडून ग्रामपंचायतींमध्ये प्रचार, प्रसार केला जात आहे.
तालुका ग्रामपंचायती
* मंडणगड ५
* दापोली ११
* खेड १३
* चिपळूण १४
* गुहागर ७
* संगमेश्वर ११
* रत्नागिरी २२
* लांजा ७
* राजापूर १५