माजी सभापती स्वप्नाली सावंत यांचा जाळून खून?

रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत बेपत्ता प्रकरणात मोठी माहिती पुढे आली आहे. स्वप्नाली सावंत यांना जाळून मारण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात भादंविक ३०२,२०१, १२० (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यामध्ये स्वप्नाली सावंत यांच्या पतीचाही समावेश आहे. अटक केलेल्या तिघांना दि. १९ सप्टेंबर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस कोठडीच्या कालावधीत सुकांत सावंत याने आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने पत्नीची हत्या करुन मृतदेहाची कशी विल्हेवाट लावली हे उघड होणार आहे.

पती सुकांत उर्फ भाई सावंत, रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत आणि प्रमोद बाबू गावनांक यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. १ सप्टेंबर रोजी कट कारस्थान करून या तिघांनी स्वप्नाली यांना जाळून मारल्याची हादरवून टाकणारी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत प्रकरणात शहर पोलिसांनी या तिघाजणांना रविवारी सकाळी अटक केली आहे. दोघांमध्ये अनेकदा वाद होत असत एकमेकांचे फार पटत नव्हते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. पण, या हत्येमागचं नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

रत्नागिरी पोलिसांनी महत्वपूर्ण तपास करत फार कोणतीही माहिती नसतानाही मागील आठ दिवस कसून तपास सुरु ठेवला होता. सतत गेले आठ दिवस मिऱ्या बंदर येथे जाऊन जागेवर जाऊन तपास केला आहे. यामध्ये डॉग स्कॉडचीही मदत घेण्यात आली होती. जाळून मारल्यानंतर ही राख या संशयित आरोपींनी समुद्रात टाकली होती. त्यामुळे कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. रत्नागिरी शहर पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावत या तपासात यश मिळवले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मिऱ्या येथील भाई सावंत यांच्या घरा जवळून पोलिसांनी राख आणली होती. ती तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली आहे. स्वप्नाली सावंत यांना जाळून मारल्याचा आरोप रत्नागिरी शहर पोलिसांनी ठेवला आहे. दरम्यान, स्वप्नाली सावंत या दिनांक १ सप्टेंबर पासून त्यांच्या मिऱ्या येथील घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचे पती सुकांत उर्फ भाई सावंत यांनीच शहर पोलीस ठाण्यात केली होती.

दि.१ सप्टेंबरच्या दिवशीच सुकांतने बंगल्याच्या मागील बाजूला स्वप्नालीचा मृतदेह  जाळून टाकला. तेथील जागा पुर्णत: स्वच्छ करुन लादीवर टिसीएल पावडर टाकण्यात आली होती. त्यानंतर राखेसह हाडे गायब केली. स्वप्नालीच्या हत्येचा कोणताचा पुरावा सुकांत सावंत यांने घटनास्थळी ठेवला नव्हता. त्यानंतर  पत्नीच्या हत्येचा संशय आपल्यावर येवू नये यासाठी त्याने दि.२ सप्टेंबरला पत्नी स्वप्नाली सावंत बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात दाखल केली होती.

दरम्यान सौ. स्वप्नाली सावंत यांच्या आई संगिता कृष्णा शिंदे (वय ६४ रा.तरवळ, रत्नागिरी)  दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी सुकांत गजानन सावंत (वय ४७ रा.सडामिर्‍या , रत्नागिरी) ,चुलत भाऊ रुपेश ऊर्फ  छोटा भाई कमलाकर सावंत (रा.४३ रा.सडामिर्‍या , रत्नागिरी) , प्रमोद बाबू गावनांक (वय ३३ रा.सध्या मिर्‍या, मूळ गुहागर,  कामगार) या तिघांविरोधात भादंविक ३०२,२०१, १२० (ब)  नुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रवीण स्वामी आदी पोलिसांच्या पथकाने या तपासात मेहनत घेतली.