देवरूख:- ऐन शिमग्याच्या धामधुमीत गावोगावी ग्रामदेवतांच्या पालख्या भक्त गणांच्या भेटीला त्यांच्या स्वगृही येतात. अशा काळात एखाद्या कुटुंबात कुणाला देवाज्ञा झाली तर ती गैरसोय होऊ शकते. असाच काहीसा बाका प्रसंग विघ्रवली गावातील हर्डीकर कुटुंबीयांवर आला.नातेवाईक यांची संख्या पुरेशी नसल्याने मृतदेहाचे अंत्यसंस्कार पुर्ण करण्यासाठी रीतीरिवाजाचे जोखड झुगारून विघ्रवली गावातील माजी महिला सरपंच संपदा भुरवणे यांनी स्वतः खांदा देत स्मशानभूमीत सरण रचण्यासह अंत्यसंस्काराला मदत करत समानता हीच मानवता आहे हे दाखवून नवा आर्दश निर्माण केला आहे.
गावातील जवळपासच्या सर्व लोकांना या घटनेची माहिती दिली. तशीच माहिती काटवली ढोसळवाडी येथील लोकांपर्यंत त्या कुटूंबाने दिली. कारण ही लोकवस्ती हाकेच्या अंतरावर आणि अगदी नदिपलीकडे आहे.परंतु देवाच्या पालखीचे शिंपण सुरू होते. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी लोक उशीरा पोहोचतील असे त्या कुटुंबाला कळविण्यात आले होते.
या कुटुंबाची अथवा उपस्थित नातेवाईक यांची संख्या पुरेशी नव्हती की या मृतदेहाचे अंत्यसंस्कार पुढाकाराने पुर्ण करता आले असते.अशा विपरीत परिस्थितीत विघ्रवली गावातील माजी महिला सरपंच सौ.संपदा भुरवणे यांनी उचललेले पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. उशीरापर्यंत प्रेत ठेवणे योग्य नसल्याने काही गावकरी आणि कुटुंबीयांना सोबत घेऊन संपदा भुरवणे यांनी अन्य पुरुष मंडळींसोबत अंत्यसंस्काराची तयारी करत रीतीरिवाजाचे जोखड झुगारून चक्क प्रेताला खांदा तर दीलाच व अंत्यसंस्काराला सरणासाठी लाकडे आणणे लावणे ही कामे त्यांनी केली.
संपदा भुरवणे या काटवली ढोसळवाडी येथील माहेरवाशीण, एक आदर्शवत कृती करुन संपदा भुरवणे यांनी इतर महिलांसह रीतीरिवाजाचा कर्मठपणा मोडत समाज व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी कोणाची ही तमा न बाळगता स्वतःला झोकून देत नवा आदर्श निर्माण केला आहे.
संपदा भुरवणे या पंचक्रोशीतील माघी गणरायाची निस्सीम भक्त आहे. त्यांनी रितीरिवाजचा बागुलबुवा झुगारून केलेली ही कामगिरी पंचक्रोशीसह तालुक्यातील सर्व लहान थोरांना अभिमान वाटावा अशी आहे. इतरांच्या दुःखात सहभागी होताना, चाकोरीबाहेर पाऊल टाकण्याचे धाडस क्वचित काही लोक करतात. काही गोष्टी म्हणजे भ्रामक कल्पना आहेत. काहीजण हे नुसते भाषणबाजी करत याला आव्हान न देता टाळाटाळ करतात पण या हीरकणीने हे आव्हान लिलया पेलत कृतीने समाजात बदल घडवून आणण्यासाठी उचलेले हे शिवधनुष्य निश्चितच प्रेरणा स्त्रोत निर्माण करेल.