माजी आमदाराच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला 

चिपळूण:- चिपळुणातील माजी आमदाराचा बंगला चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली आहे. चिपळूण शहरात असलेल्या  माजी आमदार कै. बापूसाहेब खेडेकर यांचा रविवारी बंगला फोडल्याचे दिसून आले. खेडेकर यांचे कुटुंब बाहेर गावी गेल्यामुळे नेमका किती ऐवज लंपास झाला याची माहिती मिळू शकली नाही. माजी आमदारांचा बंगला फोडण्याची बातमी चिपळुणात पसरताच पोलिसांचीही झोप उडाली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

रविवारी या घटनेचा पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. माजी आमदार कै. बापूसाहेब खेडेकर यांचे कुटुंबीय कामानिमित्त मुंबईला गेले आहेत. त्यामुळे बंद बंगला असल्याची संधी साधून चोरट्यांनी डल्ला मारला. यावेळी बंगल्यातील साहित्य अस्ताव्यस्त पसरले होते. चोरट्यांनी बंगला फोडण्याची माहिती खेडेकर याना कळवली. मात्र मुंबईहून घर मालक आल्यानंतर नेमका किती ऐवज गेला हे समजणार आहे.