दापोली:- दापोली तालुक्यात करंजाळी येथील खापरेवाडीत रानटी डुकराची शिकार करणाऱ्या दोन शिकाऱ्यांना वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. रविवारी सायंकाळी उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे. रविवारी दुपारपासून चौकशीसाठी गेलेल्या वनविभाग पथकाच्या हाती काहीच न लागल्याने हे पथक मागे फिरण्याच्या विचारात होते, मात्र याच वेळी हत्याराना धार लावण्याचा दगड दिसल्याने पुन्हा परिसराची झडती घेताना एका ठिकाणी केळीच्या पानावर रक्ताचे डाग दिसले. त्यावेळी पुन्हा परिसराची तपासणी सुरू केली, आणि हे सगळे शिकार प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. रविवारी दुपारी २ वा.च्या सुमारास मौजे कंरजाळी (खापरेवाडी) ता.दापोली येथील संशयीत आरोपी दशरथ धोंडू बुटे रा. कंरजाळी (खापरेवाडी) याच्या राहते घरी जावून चौकशी केली असता,त्याने सुरवातीस उडवा उडवीचे उत्तरे दिली, चौकशी कामी गेलेल्या वनधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वनाधिकारी यांनी संशयीत आरोपी दशरथ बुटे यांचे घराच्या आसपासच्या परिसराची तपासणी केला असता, धार लावण्याचा दगड आढळल्याने परिसराची पाहणी केली यावेळी केळीच्या पानावर रक्ताचे डाग पडलेचे दिसून आले. संशयीत आरोपी दशरथ बुटे यांच्या घराच्या शेजारी असलेल्या श्रीमती छाया रामचंद्र बुटे यांचे बंद घराच्या मागील बाजूस असणाऱ्या गुरांच्या वाडयामध्ये रानडुक्कराचे अवयवाचे मासाचे बारीक तुकडे केलेचे दोन प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक बादलीमध्ये आढळून आल्याने, सदरचे रानडुक्कराचे मासाचे दोन प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक बादली तसेच आरोपी यांनी रानडुक्कर या वन्यप्राण्यांची शिकार करणेसाठी वापरलेली ॲल्युमिनियमची तब्बल ८० मीटर तार, विद्युत वाहक तार वीस मीटर, दोन कोयते, दोन सुऱ्या हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संशयित आरोपी दशरथ धोंडू बुटे यांच्याकडे सदरच्या मृत वन्यप्राण्यांबाबत अधिक चौकशीत त्याने राहत्या घराजवळ असणाऱ्या शेतामध्ये विद्युत तारेचा सापळा लावून रानडुक्कर या वन्यप्राण्यांची शिकार केल्याची माहिती दिली,या दोघांनी रानडुक्कर या वन्यप्राणी शिकार केल्याचा गुन्हा कबुल केल्याची माहिती वनपाल साताप्पा सावंत यांनी दिली.
जेरबंद करण्यात आलेल्या दोन्ही संशयित आरोपीवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ०९,३९,४४, ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अधिनियमामध्ये रानडुक्कर हा एक सस्तन वन्यप्राणी आहे. वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत अनुसुचि ०३ मध्ये सामाविष्ट आहे. सदर प्राण्याची शिकार करणे, तस्करी करणे, व्यापार करणे, बंदिस्त करणे आणि जवळ बाळगणे या गुन्ह्यांस तीन वर्षापर्यंतचा सक्त कारावास किंवा २५,००० रूपये दंड किंवा दोन्ही शिक्षा अशी शिक्षेची तरतुद आहे.
सदरची कार्यवाही मा. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्री.दिपक खाडे सर, मा. सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) श्री. सचिन निलख सर यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी दापोली वैभव बोराटे, वनपाल दापोली साताप्पा सावंत, वनरक्षक बांधतिवरे गणपती जलणे, वनरक्षक ताडील सिध्देश्वर गायकवाड, वनरक्षक खेर्डी सुरज जगताप, वनरक्षक कोंगळा शुभांगी गुरव यांनी कार्यवाही पार पाडली. सदर गुन्हाचा पुढील तपास परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली वैभव बोराटे, हे मा. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे व मा. सहा. वनसंरक्षक (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
दरम्यान नागरीकांनी आपल्या आजुबाजूला वन्यजीव शिकार व तस्करी होत असल्यास तात्काळ वनविभागास कळवावे, माहिती देणारेचे नाव गोपनीय ठेवून माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल. असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.