मागेल त्याला शेततळे योजना प्रतिसादा अभावी बारगळली

रत्नागिरी:- जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शेतीसह पालेभाज्या व फळ लागवडीसाठी शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मागेल त्याला शेततळे योजना राबवली जात आहे. मात्र, जिल्ह्यात या योजनेला मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे योजनेचा उद्देशच बाजूला पडला आहे. शेततळ्यासाठी शेतकर्‍यांनी मागणी करावी म्हणून शासनाकडून ‘मागेल त्याला शेततळे’ उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवली जात आहे.

शेततळे निर्माण केल्यास उत्पादनात व उत्पन्नात वाढ होवून जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याने बहुसंख्य शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून पावसाच्या सरासरीत घट झाली आहे. पावसाचे कमी प्रमाण व अनिश्चिततेमुळे ग्रामीण भागातील कोरडवाहू क्षेत्रातील भातशेती, भाजीपाला पिकांवर व फळपीक लागवडीवर तसेच उत्पादनावर त्याचा विपरित परिणाम होताना दिसून येतो. पावसात पडलेला खंड, पाण्याची टंचाई यामुळे पिकांचे नुकसान होऊ नये व उत्पन्नात व्हावी, यासाठी शासनाकडून शेतकर्‍यांसाठी शेततळे उपलब्ध करून दिले जात आहेत. 15 मीटर लांबी-रुंदी व 3 मीटर खोलीसाठी 26 हजार रुपये, तर 34 मीटर लांबी-रुंदी व 3 मीटर खोलीसाठी 75 हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जात आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातून सुमारे अडीचशे प्रस्ताव आले.
शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र त्यातील योजनेतील किटकट अटींची पुरताता न केल्याने अनेक शेतकरी स्वत:हून योजनेतून बाहेर पडले. त्यापैकी केवळ 38 शेतकरीच लाभार्थी ठरले आहेत. शेततळ्यासाठी तालुक्यातील शेतकर्‍यांनी 2023 – 24 या वर्षात ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यामुळे प्रस्तावित शेतकर्‍यांना शेततळे मंजूर झाले आहे.
या योजनेसाठी शेतकर्‍यांच्या कमी प्रतिसादामुळे योजनेसाठी अनुदान असतानाही काही किचकट अटी रद्द केल्यास याचनेला प्रतिसाद मिळू शकतो. अशी शेतकर्‍यांनी मागणी केली आहे. शासनाकडून मागेल त्याला शेततळे उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवली जात आहे. शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यास योजनेचा लाभ शेतकर्‍यांना घेेता येणार आहे.