रत्नागिरी:- फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्याच्या वातावरणात कमालीचे बदल होत असून, कमाल व किमान तापमानात 20 ते 25 अंशाचा फरक असल्याने आरोग्यावर याचा विपरित परिणाम होत आहे. पहाटे हुडहुडी भरवणार्या थंडीनंतर दिवसभर कडक ऊन सहन करणारे रत्नागिरीकर ग्लोबल वॉर्मिंगचा वार सहन करत आहेत.
एकाच ऋतूमध्ये अनेक मोसमांचा अनुभव घेता येत आहे. यापूर्वी हिवाळा आणि उन्हाळ्यात पाऊस, थंडी, ऊन अशा तिन्ही ऋतूंचा अनुभव आला आहे. सध्या फेब्रुवारी महिना सुरू असून, फेब्रुवारीच्या मध्यावधीला सुरुवात झाली आहे. या काळात दिवसभर जाणवणार्या उन्हाच्या तुलनेत रात्री व पहाटेच्या सुमारास थंडी ओसरावी, असाच पूर्वीचा अनुभव होता. हे चित्र बदलले असून, रात्री व पहाटेच्या सुमारास थंडी वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये हुडहुडी भरत आहे.
विचित्र ऋतूच्या अनुभवामुळे सर्दी, थंडी, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, खोकल्याचेही रुग्ण वाढत आहे. याचा त्रास ज्येष्ठ नागरिक, बालके, गरोदर माता, दमा, अस्थमा व इतर आजार असलेल्या रुग्णांना होत आहे. दवाखान्यातही उपचारासाठी याच रुग्णांची अधिक गर्दी असल्याचे दिसत आहे. अति थंड, तळलेले पदार्थ टाळण्याबरोबरच तेलकट, तुपकट पदार्थ टाळण्याचे आवाहन डॉक्टर करत आहेत. बदलेल्या अशा वातावरणामुळे हवेने प्रदूषणाची खूप उच्च पातळी गाठली आहे. आजारी लोकांसाठी ती रोगट बनली आहे. बहुतांश जणांना श्वास घेण्यात अडचणीही येत आहेत. अशा रुग्णांनी काळजी घ्यावी व आपले आरोग्य जपावे, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.