रत्नागिरी : भाट्ये समुद्रात आज (दि.२१) सकाळी 10 वाजता मच्छिमारी बोट बुडाली. दोन्ही इंजिन बंद पडल्याने तसेच मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे ही बोट बुडाली. बोटीतील चार खलाशांना वाचवण्यात यश आले असून, एकजण बेपत्ता आहे. वाचलेल्या चार जणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
फईम पाईक शेख (21), उजेफा निजामुद्दीन मुल्ला (21), अफरान मेहमुब मुजावर (22) अय्याज गुलाब माखजानकर (36,सर्व रा. जयगड, रत्नागिरी) अशी बचावलेल्या चार खलाशांची नावे आहेत. ओवेस अजूम मखी (21,) रा. जयगड, रत्नागिरी हा समुद्रात बेपत्ता झाला आहे.
अल इब्राहिम ही बोट राजीवडा येथील इम्रान सोलकर यांच्या मालकीची होती. ती जयगड येथील खलील सोलकर यांनी करारावर घेतली होती. रविवारी पाचजण बोट घेउन राजीवडा जेटीवरुन मिरकरवाडा जेटीवर जात असताना बोटीची दोन्ही इंजिन बंद पडली. तसेच समुद्रही खवळलला होता. लाटेच्या तडाख्यामुळे बोट बुडाली. त्यामुळे बोटीतील पाचहीजण पाण्यात पडले. दरम्यान, समुद्रात बोट बुडत असल्याचे लक्षात येताच काही अंतरावर असलेल्या भाटकर वाडा येथील एक मच्छिमार बचावकार्यासाठी धावले. नौका आणि रमजानी बोटीवरील शकीब सोलकर, नुमान सोलकर, निसार वस्ता आणि शाहिद वस्ता या दोन बोटींवरील खलाशांनी बुडणार्या बोटीवरील चार जणांना वाचवले. परंतु यातील ओवेस मखी हा तरुण पाण्यात बेपत्ता झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक राठोड, पोलिस हेड काँस्टेबल प्रवीण बेंदरकर, पोलिस काँस्टेबल विक्रांत कदम, पोलिस नाईक निखिल माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने बोटीतून ओवेस मखीचा शोध घेत होते.