महेश मांजरेकर यांना रत्नागिरीतून खंडणीचा फोन

खेड:- अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना ३५ कोटीच्या खंडणीची धमकी दिली होती. दादर पोलीस ठाण्यात मांजरेकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी खंडणीखोराला अटक केली असून हा खंडणीखोर रत्नागिरीतील खेड तालुक्यातील असल्याचे पुढे आले आहे. संबंधित खंडणीखोर हिस्ट्रीशिटर असून त्याचा अबू सालेम सोबत काही संबंध आहे का? याचा कसून तपास सुरू आहे. 

यासंदर्भात एएनआयने ट्विट करत माहिती दिली आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या टोळीमधील एका व्यक्तीने खंडणीसाठी फोन केला होता. महेश मांजरेकर यांना धमकीचा फोन करुन ३५ कोटींची खंडणी मागणाऱ्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

महेश मांजरेकर यांना २६ ऑगस्ट, बुधवारी ३५ कोटी रुपये खंडणीच्या धमकीचा फोन आला होता. त्यानंतर त्यांनी तातडीने दादर पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने तात्काळ रत्नागिरीतील खेड तालुक्यातील एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचा अबू सालेमशी काही संबंध आहे का? धमकी देण्यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात येत आहे.