६ जूनपर्यंत पोलिस कोठडी; महिनाभरातच गुन्हा उघड, शहर पोलिसांची कामगिरी
रत्नागिरी:- शहरातील नरहर वसाहत-धन्वंतरी हॉस्पिटल दरम्यान पोलिस असल्याचे सांगून वृद्ध महिलेला १ लाख ४० हजाराचे दागिने लांबवणाऱ्या तोतया पोलिसाला अटक केली. कोल्हापूर न्यायालयाच्या परवानगीने शहर पोलिसांनी या गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
शब्बीर जावेद जाफरी (वय ३४ रा. मुळ, कदम वाक वस्ती, लोणी काळभेर, ता. हवेली, जि. पुणे, सध्या रा. परळी वैजनाथ जि. बीड ) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. श्रद्धा शिवाजी पावसकर (वय ६२, रा. शंखेश्वरनगर, आरोग्यमंदिर, रत्नागिरी) या शंखेश्वरनगर ते नरहर वसाहत, धन्वंतरी हॉस्पिटल अशा चालण्यासाठी जातात. ७ मे रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे चालत जात असताना फोम वॉश येथे आल्यानंतर दोन अनोळखी व्यक्ती सौ. पावसकर यांच्या पाठीमागून आले. आम्ही पोलिस आहोत, असे सांगून त्यांच्या गळ्यातील ५५ हजाराचे काळे मणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र व ८५ हजाराच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या. त्या बदल्यात दोन पिवळंसर धातूच्या बांगड्या रुमालात-कागदात बांधून देऊन सौ. पावसकर यांची फसवणूक केली. या प्रकरणी सौ. श्रद्धा पावसकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाले करत आहेत.
शब्बीर जाफरी हा कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात ताब्यात होता. मुख्य न्यायदंडाधिकारी कोल्हापूर प्रोडक्शन वॉरंटद्वारे मंजुरी घेऊन अधीक्षक सब जेल कोल्हापूरमधून काल (ता. १) त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयिताने जिल्हा अन्य ठिकाणी गुन्हे केले आहेत का? या गुन्ह्यातील मुद्देमाल यावर पोलिसांचा तपास सुरू आहे. संशयिताची जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.