रत्नागिरी:- तालुक्यातील मावळंगे वरची गुळेकर वाडी येथील मनिषा मंगेश वारीशे या महिलेला दुचाकीवरुन फसवून नेताना झालेल्या झटापटीत दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी संशयित दिवाकर सुधाकर शिंदे याला पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी झाली होती. मात्र न्यायालयाने पुन्हा त्याचा जामीन नाकारुन नव्वद दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
दि. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान गणेश मंदिरातील दर्शनानंतर घरी परतत असताना वाटेत वाडीतील दिवाकर सुधाकर शिंदे याने मनात महिलेबद्दल वाईट हेतू ठेवून एका मुलाला वाटेतच सोडून तिच्यापाशी येऊन ‘तुझी आई आजारी आहे’ असे कारण सांगून मनात वाईट हेतू ठेवून गाडीवर बसण्यास सांगितले होते असा त्याच्यावर आरोप आहे. नियोजित ठिकाणी दुचाकी न थांबता नाखरे साळवीवाडी परिसरात वेगाने गाडी घेऊन तो जात आहे हे लक्षात आल्यानंतर महिलेने दिवाकर सुधाकर शिंदे याची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याने गाडी न थांबवल्याने झालेल्या झटापटीत ती महिला गाडीवरून पडली, त्यात तिचा मृत्यू झाला. या संदर्भात पोलिस तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा छडा लावण्यासाठी वेगाने तपास यंत्रणा कामाला लावली. अखेर पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने तपास कार्य सुरु झाल्यानंतर मोठ्या शिताफीने महिलेच्या मृत्यू प्रकरणी संशयित म्हणून दिवाकर शिंदे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्या नंतर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. या प्रकरणी आरोपीला पंधरा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने जामीन नामंजूर करून त्याला पुन्हा नव्वद दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.