महिला प्रभागसंघाना 4 टुरिस्ट बसचे वाटप

रत्नागिरी:- महिलांना सक्षम करण्यासाठी शासन नेहमीच पुढाकार घेत आहे. जिल्ह्यातल्या पर्यटन वाढीसाठी टुरिस्ट बसचा चांगला वापर करा. आणखी 21 गाड्यांचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद रत्नागिरी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून कोतवडी येथील एकता महिला प्रभाग संघ, वाटद येथील जीवनज्योती महिला प्रभाग संघ, कसबा येथील शौर्य महिला प्रभागसंघ आणि हर्णे येथील संघर्ष महिला प्रभागसंघाला प्रत्येकी 32 लाख 6 हजार रुपयांची टुरिस्ट बस पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते देण्यात आली. स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्रकल्प संचालक श्रीकांत हावळे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, बाबू म्हाप, सुदेश मयेकर, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी ही बस दिली आहे. महिला, युवक, शेतकरी, कामगारांना न्याय देणारे शासन आहे. मेहनत करणार असाल तर, आणखी वाहने देऊ. शहरातल्या लोकांना दाखवून द्या, महिला वाहन चालवू शकते. 8 महिलांची नावे द्यावीत, त्यांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. 1 कोटीची हाऊस बोट देखील जिल्ह्यात दाखल होणार आहे. राज्यातील आजचा हा एकमेव असा अभिनव उपक्रम आहे. या एका बसमुळे वाहक, चालक, ही बस ज्या हॉटेलवर जाणार आहे, त्या हॉटेलमधील सर्व लोकांना रोजगार मिळणार आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद दिले पाहिजेत. लेक लाडकी, अन्नपूर्णा योजना, तीर्थ दर्शन या योजनांचा लाभही घ्यावा. मिळालेल्या टुरिस्ट वाहनावर एवढे चांगले काम करा की स्वत:च्या ताकदीवर तुम्ही 10 गाड्या घेतल्या पाहिजेत, असेही पालकमंत्री म्हणाले.


पालकमंत्र्यांनी स्वतः चालवली टुरिस्ट बस
महिला प्रभागसंघाना देण्यात येणाऱ्या टुरिस्ट बस पैकी एका बसमध्ये पालकमंत्री श्री. सामंत चालकाच्या जागेवर बसले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी महिला प्रभागसंघाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन पालकमंत्र्यांनी ही बस स्वत: चालवत, एक फेरफटका मारुन आणला.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले, आजचा क्षण ऐतिहासिक आहे. पर्यटनला चालना मिळण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी टुरिस्ट बस प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची पॅकेज करुन निश्चितपणे पर्यटनाला चालना दिली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याचबरोबर राजमाता जिजाऊ , क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सफर रत्नागिरीची या ॲपचे लोकार्पण आणि उमेद सफर रत्नागिरीचे या माहिती पत्रकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.