रत्नागिरी:- लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल अमोल मांजरे याला निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी पुणे येथील वाघोली पोलिस ठाण्यात गुरुवारी (२४ एप्रिल) गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि अमोल मांजरे यांची ओळख पोलीस भरती प्रशिक्षणादरम्यान २०१८ साली एका अकादमीत झाली होती. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. नियमित भेटीगाठींनंतर अमोलने लग्नाचे वचन दिले. मात्र, काही काळानंतर त्याने लग्नास नकार दिला व आई-वडिलांनी दुसरी मुलगी पसंत केल्याचे कारण पुढे केले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने पुणे वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलिस विभागाने तत्काळ कारवाई करत अमोल मांजरे याला निलंबित केले असून, प्राथमिक चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याची सेवा निलंबित राहणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलिस ठाणे (पुणे) करीत असून, घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.