महिलांवरील अत्याचाराकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष: उमाताई खापरे

रत्नागिरी:- महिलांवरील अत्याचार गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. परंतु गुन्हेगारांवर कारवाई होताना दिसत नाही. निवेदन दिल्यानंतरही मुख्यमंत्री व गृहमंत्री दुर्लक्ष करीत आहेत. दिशा कायदा होताना दिसत नाही. महिला आयोग, बाल आयोगाची पदे रिक्त आहेत. हे तीन तिघाडी काम बिघाडी सरकार असल्याची टिका भाजपाच्या महिला सेलच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी केली.

कोकण दौर्‍यावर आलेल्या उमाताई खापरे यांनी संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, रत्नागिरी येथे पहिला पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उत्तर रत्नागिरीची कार्यकारिणीही त्यांनी यावेळी जाहीर केली. यावेळी भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, निलम गोंधळी,ऐश्वर्या जठार, राजश्री शिवलकर यांच्या पुण्याच्या अश्विनीताई जिचकार या उपस्थित होत्या.

महाआघाडी सरकारच्या कामकाजाविषयी श्रीमती खापरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. मात्र दिशा कायदा करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे यापुढे भाजपाकडून रणरागिणी ग्रुपचे संघटन केले जाणार असून यात वकिल, पत्रकार यांच्या विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांचा समावेश केला जाणार आहे. महाआघाडी सरकार स्थापन होऊन वर्ष होत आले आहे. परंतु अद्यापही महिला आयोग, बाल आयोगाच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती झालेली नाही. भाजप सरकारच्या वेळी अत्याचाराच्या घटनांनंतर महिला पदाधिकारी घटनास्थळी जाऊन, गुन्हेगारांवर होणारी कारवाई, अत्याचारग्रस्तांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होत्या. आता महिलांच्या सुरक्षेचे धिंदवडे निघत असल्याची टिका त्यांनी केली.