वसुलीसाठी महावितरणचे संचालक मैदानात;
जिल्ह्यात ५७ कोटी ३७ लाख थकीत
रत्नागिरी:- वाढत्या थकबाकीमुळे राज्यात महावितरण कंपनी आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आहे. राज्यात सुमारे ५९ हजार कोटी रुपये थकबाकी आहे. त्यात एकट्या रत्नागिरी जिल्ह्याची थकबाकी ५७ कोटी ३७ लाख आहे. थकबाकीतून सावरण्यासाठी आणि वीज बिलाच्या कोट्यवधीच्या थकबाकी वसुलीसाठी प्रकाशगड या महावितरणच्या मुख्यालयातील सहा संचालकांना परिमंडळामध्ये ‘ऑन फिल्ड’ पाठविले जाणार आहे. कोकण परिमंडळासाठी संचालक गडकरी लवकरच जिल्ह्यात दाखल होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी आर्थिक दृष्ट्या डबघाईला आली आहे. त्याततून बाहेर निघण्यासाठी आणि वीज बिलाच्या कोट्यवधीच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने हा निर्णय घेतला आहे. महावितरण मुख्यालयातील सहा संचालकांना ऑन फिल्ड परिमंडळामध्ये पाठविले गेले आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी २२ जूनला हे आदेश जारी केले. या सहा संचालकांवर परिमंडळातील थकबाकीची वसुली, चालू वीज बिलाची वसुली होते की नाही, यावर नियंत्रण ठेवणे, मार्गदर्शन करणे, आदी जबाबदारी सोपविली आहे.
महावितरण कंपनीच्या वीज बिल थकबाकीने चिंता वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ५७ कोटी ३७ लाख थकबाकी आहे. दोन वर्षात निसर्ग आणि तौक्ते वादळामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशा परिस्थितीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू ठेवणे शक्य नाही. थकीत वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यास कंपनीने सुरवात केली आहे. या कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या स्थानिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा कंपनीने दिला आहे.
ग्राहकांना थकीत बिल भरण्यासाठी विनंती महावितरणकडून करण्यात येत आहे. अद्याप पर्यंत कठोर कारवाई आतापर्यंत केली नव्हती. मात्र कंपनीची थकबाकी चिंता वाढविणारी आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीवर महावितरणने भर दिला आहे. कोकण परिमंडळात संचालक गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली केली जाणार असल्याची माहिती महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिली.