वीजजोडण्या तोडल्या; अजूनही ३२ कोटी ७६ लाखाची थकबाकी
रत्नागिरी:- महावितरण कंपनीपुढे अजूनही थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान आहे. जिल्ह्यातील १ लाख १२ हजार २४६ ग्राहकांकडून ३२ कोटी ७६ लाखाची थकबाकी आहे. थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ३९७ ग्राहकांना महावितरणने दणका दिला असून, त्यांची जोडणी तोडली आहे. त्यांनी कंपनीचे ३३ लाख १० हजार थकवले आहेत.
महावितरण कंपनी कोरोना महामारीनंतर मोठ्या आर्थिक संकटात होती. त्यानंतर वसुलीसाठी वीजजोडण्या तोडू नयेत असे आदेश शासनाकडून दिले होते. त्यामुळे वसुलीसाठी महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून ही वसुली करण्यात आली; परंतु यामुळे अपेक्षित वसुली झाली नाही. कंपनीवरील थकबाकीचा डोंगर वाढतच गेला. कंपनी आर्थिक अडचणीत आल्यानंतर सक्तीची वसुली सुरू करण्यात आली.
थकबाकी वसुलीसाठी महावितरणने कठोर भूमिका घेतली आहे. त्यासाठी वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्राहकांची जोडणी तोडण्यात येत आहे. चिपळूण विभागात ५५ ग्राहकांच्या जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून २ लाख ७४ हजार थकबाकी आहे. खेड विभागातील १४१ ग्राहकांकडून ११ लाख ३ लाख थकीत आहेत. रत्नागिरी विभागात २०१ ग्राहकांचे १९ लाख ३३ हजार थकीत आहेत. एकूण ३९७ ग्राहकांना वारंवार सूचना कंपनीचे ३३ लाख १० हजार रुपये थकवल्याने त्यांची वीजजोडणी तोडण्याचा कठोर निर्णय महावितरणने घेतला आहे.