24 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी बैठकीचे आयोजन
रत्नागिरी:- तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या मालकीच्या जागेतून विज वितरण कंपनीची 132 केव्ही वीज वाहीनीसाठी शेतकर्यांच्या शेती बागायतीत मोठ-मोठे टॉवर अनेक वर्षांपूर्वी उभे केलेले आहेत. जीर्ण झालेल्या टॉवरच्या बाजूला नव्याने टॉवर उभे करण्यासाठी अल्प मोबदल्याचे आमिष दाखवून शेतजमिन घेतली जात आहे. शेतकर्यांना सावध करण्यासाठी 24 नोव्हेंबरला रत्नागिरीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असे तानाजी कुळ्ये यांनी सांगितले.
तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या जागेतून गेलेल्या 132 केव्ही वीज वाहिनीसाठी सुमारे 30 ते 40 वर्षांपूर्वी विजवितरण कंपनीने हे टॉवर उभारणी केली होती. हे टॉवर आज जीर्ण झाल्याने मोडकळीस व नादुरूस्त झालेले आहेत. त्यामुळे विज वितरण कंपनीने नवीन टॉवर उभे करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी जुन्या टॉवरच्या बाजूलाच दुसरी पर्यायी जागा निवडली जात आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकारी विज वाहिनी गेलेल्या मार्गातील जागाधारक शेतकर्यांना गावोगावी गाठून अल्प मोबदल्याचे आमिष दाखवून त्यासाठी समंतीपत्र घेत आहेत. त्या शेतकर्यांनी वेळीच सावध व्हावे, कुठल्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
युनिटद्वारे भरमसाठ विजबिले आकारणार्या राज्य विद्युत महामंडळाला शेतकर्यांच्या जमिनींचे आज मोल नाही का, असा सवाल केला आहे. उभारण्यात येणार्या टॉवरखालील जागांना अल्प मोबदला तो सुध्दा अल्प प्रमाणात दिला जातो. दोन टॉवरच्या मधून विजेच्या वाहिन्या गेलेल्या मार्गातील जागांचा शेतकर्यांना मोबदला कोण देणार ? असा प्रश्न श्री. कुळ्ये यांनी उपस्थित केला आहे. शेतकर्यांची होणारी फसवणूक येथील प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे. त्यासाठी बाधित धोरण निश्चित केले जाणार असन 24 ला रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी-आकाशवाणी केंद्राजवळ महालक्ष्मी मंदीर येथे सकाळी 10.30 वाजता बैठक होणार आहे.