महारेरा देणार गृहप्रकल्पांना मानांकन; पुढील वर्षीपासून अंमलबजावणी

रत्नागिरी:- घराचे व्यवहार करणे सुलभ व्हावे, तसेच त्यामध्ये कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा आता गृहप्रकल्पांना मानांकन देणार आहे. मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी 20 एप्रिल 2024 पासून करण्यात येणार आहे. त्यानुसार महारेराने मानांकन ठरविण्याच्या दृष्टीने 15 जुलैपर्यंत सूचना आणि हरकती मागविल्या आहेत.

मानांकनासाठी ठरविण्यात आलेले निकष आणि यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव महारेराने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.
बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता यावी आणि ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेराची स्थापना झाली आहे. त्यानुसार महारेराकडून यासाठी रेरा कायद्याअंतर्गत अनेक तरतुदी करत त्यांची अंमलबजावणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता महारेराने प्रकल्पांना आणि प्रवर्तकांना मानांकन देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून प्रकल्पाची, विकासकांची विश्वासार्हता समजेल, प्रकल्पासाठीच्या परवानग्या घेतल्या आहेत का या आणि अशा सर्व बाबी या मानांकनाच्या अनुषंगाने स्पष्ट होतील. यामुळे ग्राहकांना घर घेणे सोपे होईल असे म्हणत महारेराने प्रकल्पांना आणि प्रवर्तकांना मानांकन देण्याचे ठरविले आहे.

त्यानुसार जानेवारी 2023 नंतर नोंदणीकृत झालेल्या प्रकल्पांना ही पद्धत लागू केली जाणार आहे. वर्षातून दोनदा प्रकल्पांचे मानांकन जाहीर केले जाणार असून, 1 ऑक्टोबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीतील माहितीच्या आधारे पहिले मानांकन 20 एप्रिल 2024 पासून उपलब्ध करून देण्यात येण्याचा महारेराचा प्रयत्न आहे. दरम्यान ग्राहकांना प्रकल्पाची सर्व आणि योग्य माहिती देण्यासाठी महारेराने यापूर्वीच प्रकल्पाची सर्व माहिती असलेले क्यूआर कोड 1 ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत वापरण्याचे विकासकांना बंधनकारक केले आहे.