राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील कंत्राटदार कंपन्यांची कार्यालये व सामुग्रीला काही दिवसांपूर्वी मनसेच्या पदाधिकार्यांनी लक्ष करीत तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस संरक्षण मिळावी अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पनवेल येथील सभेनंतर मुंबई-गोवा महामार्गावर रायगडपासून राजापूरपर्यंत रखडलेल्या भागांमध्ये मनसेच्या पदाधिकार्यांनी ठेकेदारांच्या कार्यालये व यंत्रसामुग्रींना लक्ष करीत तोडफोड केली होती. यात अनेक ठिकाणी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात तर मनसेच्या पदाधिकार्यांनी एका जेसीबीची तोडफोड केली. हा जेसीबी रत्नागिरी तालुक्यातील एका तरुणाने घेऊन कंपनीकडे कामाला लावला होता. या तरुणाने बँकेकडून कर्ज काढून हा जेसीबी घेतला असून, त्याच्या नुकसानामुळे एका मराठी तरुणाचेच मनसेने एक प्रकारे नुकसान केल्याचे चित्र आहे. त्यामुळेही मनसेच्या या आंदोलनाबद्दल जिल्ह्यात नाराजीचे वातावरण आहे.
अशा पध्दतीचे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंतांनी पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे. या तोडफोडीमुळे कंत्राटदार कंपन्यांचे अधिकारी व अभिंयताही भितीच्या छायेखाली आहेत. भविष्यातही कंत्राटदार व कंपन्यांच्या यंत्रसामुग्रीला नुकसान पोहचविण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. अनेक यंत्रसामुग्री या परदेशातील असून त्यांचा पार्टचे नुकसान झाले तरी तो परदेशातून येईपर्यंत काम थांबवावे लागणार आहे. त्यामुळे रस्ता कामावर त्याचा परिणाम होणार असल्याने, ठेकेदारा कंपनीची कार्यालये व मशिनरी असलेल्या ठिकाणी पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे.