रत्नागिरी:- शहरात मारुती मंदीर पासून हातखंबा पर्यत मोठया प्रमाणावर अतिक्रमणे दिसून आली आहेत. ही सर्व अतिक्रमणे तत्काळ हटविण्यात यावीत असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिले.
शासकीय अध्यापक महाविद्यालयात झालेल्या बैठकी दरम्यान त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी यांना हे निर्देश दिले. तसेच तहसीलदार शशिकांत जाधव यांनाही तत्काळ कारवाई करा असे निर्देश दिले.
पाली, संगमेश्वर आणि कोल्हापूर मार्गावर गेल्या काही दिवसांपासून ही अतिक्रमणे रातोरात उभी झाल्याचे दिसून आले आहे असे सांगून ते म्हणाले की काही ठिकाणी खोके आणून अतिक्रमण होत आहे तर काही ठिकाणी बांधकाम झाल्याचे निदर्शनास आले आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत अतिक्रमण करण्याची प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. यावर वेळीच उपाय योजण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.