महागाईशी गाठ, कृषी यांत्रिकी योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ 

रत्नागिरी:- शेतीसाठी लागणारे लोखंड, प्लास्टिक, शेती अवजारे, शेती यंत्रांच्या किंमतीत वाढ झाल्याने  कृषी यांत्रिकी योजनेअंतर्गत पाठविण्यात आलेल्या शेतकर्‍यांचे प्रस्ताव विना अपडेट ऑनलाईनच पडून आहेत. या महागाईचा फटका कृषी यांत्रिकीकरण योजनेला बसला असून शेतकर्‍यांनी आता या योजनेकडे पाठ फिरविली आहे.

गेली दोन वर्षे कोरोनानंतर शेतीसाठी लागणारे लोखंड, प्लास्टिक, शेती अवजारे, शेती यंत्रांच्या किंमतीत सुमारे साठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, या सर्व योजनांचे निकष  कोरोना पूर्वीचे आहेत. या योजना शेतकर्‍यांसाठी आर्थिकदृष्ट्या नुकसानीच्या ठरत आहेत. शेतकर्‍यांना अनुदानाचा लाभ मिळत नाही, परिणामी या योजनांच्या आर्थिक निकषांमध्ये वाढ करावी, अशी मागणी सातत्यानेे करण्यात आली असताना याबाबत निर्णयच झाला नसल्याने कृषी यांत्रकीच्या योजनांना हिरवा कंदील मिळत नाही.
कृषी विभागाच्यावतीने शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. मात्र, या सर्व योजनांना सध्या थंड प्रतिसाद मिळत आहे. या सर्व योजनांच्या खर्चाचे आर्थिक निकष करोना पूर्वीचे आहेत. करोनानंतर शेतीसाठी लागणारे यांत्रिकी आणि भौतिक साहित्यांच्या किंमतीत  वाढ झाल्याने यांत्रीकीचे अनुदानाचा लाभ शेेतकर्‍यांना मिळण्यात अडचणी निर्माण  झाल्या आहेत. अनुदानाचा कोणताही फायदा शेतकर्‍यांना होत नसल्याने आता शेतकर्‍यांनी या योजनांकडे पाठ फिरवली आहे. वाढलेल्या महागाईची कोणतीच दखल योजनांच्या निकषांमध्ये घेण्यात आलेली नाही. त्यामुळे अनुदानाचा लाभ घेेण्यासाठी करावी लागणारी ऑनलाईन खटाटोप आता शेतकर्‍यांनी  बंद केली आहे. याबाबत कृषी विभागाकडे संपर्क साधला असताना  कृषी यांत्रिकीच्या आर्थिक निकषात वाढ अपेक्षित असताना पूर्वीचेच निकष अंमलात असल्याने या प्रस्तावांना ऑनलाईन पूर्ततेची मान्यता देताना अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.