लांजा:- बारा वर्षाच्या अपंग लहान मुलाला मसाज करणाऱ्याकडे नेले असता अचानक त्याची हालचाल बंद झाली. अधिक उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. लांजा पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यश कल्याण घाडगे (वय १२, रा. आंबवडे- वाघोली, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता.१९) दुपारी अडीचच्या सुमारास लांजा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यश हा सहा वर्षाचा असताना अचानक तो दोन्ही पायाने अपंग होत गेला.
तेव्हापासून त्याच्यावर अनेक ठिकाणी औषधोपचार करुन तो बरा होत नव्हता. खबर देणार यांनी सोशल मिडीयाच्या युट्यूब चॅनलवर नारायण शेलार. (रा. भांबेड, तेलीवाडी, ता. लांजा. जि. रत्नागिरी ) हे लहान मुलांचे अपंगावर मसाज करुन उपचार करुन बरे करत असल्याचा व्हिडीओ पाहून यश मुलाला नारायण शेलार यांच्या घरी मसाज करण्याकरिता घेऊन आले होते. यशला ते मसाज करत असताना अचानक त्याची हालचाल बंद झाली.
तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता म्हणून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र भांबेड व तेथून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयत लांजा येथे दाखल केले, असता ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.