मशाल चिन्हावर भविष्यात रत्नागिरी विधानसभेवर भगवा फडकवू: बंड्या साळवी

रत्नागिरी:- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मशाल ही निशाणी मिळाली असून संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष साजरा केला जात आहे. येणार्‍या निवडणुका मशाल चिन्हावर लढवून जिंकु. भविष्यात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरही भगवा फडकवू, असा विश्‍वास तालुकाप्रमुख प्रदिप उर्फ बंड्या साळवी यांनी व्यक्त केला.

ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर मंगळवारी (ता. 11) रत्नागिरीत फलक लावण्यात आले. नवीन नाव आणि नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोचवण्यासाठी रत्नागिरीतील शिवसैनिक सज्ज झाले आहेत. साळवीस्टॉप येथे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसैनिकांनी घोषणा देत जल्लोष केला. मशाल ही शिवसेनेची महत्त्वाची निशाणी आहे. बाळासाहेबांचा सर्वसामान्य कार्यकर्ता पेटून उठला आहे, गद्दारांनी आता स्वतःचा विचार करावा अशा प्रतिक्रिया यावेळी शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आल्या. यावेळी तालुका संघटक प्रमोद शेरे, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शेखर घोसाळे यांच्यासह महिला वर्गही मोठ्यासंख्येने उपस्थित होता. याप्रसंगी तालुकाप्रमुख साळवी म्हणाले, शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचे पाप केंद्र सरकारमध्ये बसलेल्यांनी केले आहे. शिवसेना पक्षाला नवीन निशाणी मिळाली आहे. सगळीकडेच मोठ्या उत्साहात याचे स्वागत केले जात आहे. येणारी निवडणुक मशालीवर लढवून जिंकल्या जातील. भविष्यात विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकवला जाईल.