मयत व्यक्तीचे सातबारावरील नाव कमी करण्यासाठी 1500 ची लाच घेणाऱ्या तलाठ्याला अटक  

रत्नागिरी:- मयत व्यक्तीचे सातबारावरील नाव कमी करुन नोंद मंजूर करण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच मागणाऱ्या तालुक्यातील निवळी सजाचा तलाठी राजेश इंदल गुसिंगे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. राजेश गुसिंगेला ताब्यात घेण्यात आले आहे. तलाठ्याला लाच घेताना पकडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
 

तक्रारदार यांची आई काहि महिन्यांपुर्वी मयत झाल्याने त्यांचे सातबाऱ्यावरील नाव कमी करण्यासाठी त्यांनी सजा निवळी यांच्याकडे अर्ज केला होता. तेथील तलाठी राजेश गुसिंगे यांने सातबारावरील नाव कमी करुन तशी नोंद घालण्यासाठी २ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोड करुन १ हजार ५०० रु. देण्याचे निश्चित झाले.

याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सोमवारी सायंकाळी निवळी सजा येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. तक्रारदार यांच्याकडून रोख १५०० रु. घेताना पथकाने त्याला रंगेहात पकडले.पोलीस निरिक्षक प्रविण कदम यांच्या नेतृत्वाखाली सहा.पोलीस उपनिरिक्षक संदिप ओगले, हे.कॉ. विशाल नलावडे, पोलीस नाईक दिपक आंबेकर, पो. शिपाई गावकर यांनी हि कारवाई केली.