मयतांच्या वारसांच्या बँक खात्यात धनादेश जमा करण्यासाठी ताब्यात

जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण 

रत्नागिरी:- पोसरे दुर्घटनाग्रस्त भागातील त्या चार मयतांची घरेच गाडली आहेत. त्यांचे बँक खाते क्रमांक किंवा संबंधित तपशील वारसांकडे उपलब्ध नव्हता आणि संबंधीत बँक चिपळूणला असल्याने तलाठ्यांमार्फत मयतांच्या वारसांच्या बँक खात्यात धनादेश जमा करण्यासाठी ताब्यात घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पोसरे (ता. खेड) येथील चार मयताच्या वारसांना दिलेले मदतीचे धनादेश परत घेतले गेले. याबाबत प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. याबाबात खेड प्रांताधिकारी अविनाश सोनोने यांचा खुलासा मागविण्यात आला होता. पोसरेतील दुर्घटनेत मयतांपैकी चार मयताच्या वारसांना मदतीचे धनादेश पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. तथापि दुर्घटनाग्रस्त लोकांचे घरच गाडले गेल्यामुळे त्यांचे बँक खाते क्रमांक किंवा त्याबाबतचा तपशील वारसांकडे उपलब्ध नव्हता. संबंधीत बँक चिपळूण येथे असल्यामुळे मयतांचे नातेवाईक आणि बौध्द समाज अध्यक्ष श्यामकुमार गणपत मोहीते यांनी विनंती केल्यामुळे बँकेत जाऊन तलाठी यांच्यामार्फत मयतांच्या वारसांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी ताब्यात घेतले होते. इतर सोळा लाभार्थ्यांचे युनिअन बँकमधील खाते शोधून त्यांना 62 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

खेड तालुक्यातील 17 पैकी 16 मयतांच्या वारसांना धनादेश देण्यात आले आहेत. एका मयताचा वारस तपासा अभावी अनुदान वाटप प्रलंबित आहे. संबंधित लाभार्थीना त्यांच्या विनंतीनुसार मदत करण्याच्या व त्यांची बँक खाती शोधून त्यांच्याच बँक खात्यात मदत जमा होण्यासाठी संबंधित तलाठीमार्फत धनादेश परत घेऊन तलाठ्यामार्फत बँकेत जमा करण्याच्या उद्देशाने धनादेश परत घेण्यात आले होते, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.