मनात राग धरुन एकाला चौघांकडून मारहाण

चिपळूण:- मनात राग धरुन एकाला चौघांनी मारहाण केल्याची घटना काही दिवसापूर्वी पालवण- सावर्डेकरवाडी येथे घडली. यात मारहाण झालेल्याच्या डोक्यासह बरगडीला दुखापत झाली. या प्रकरणी त्या चौघावर सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेंद्र उर्फ बाबू वसंत सावर्डेकर, वसंत सखाराम सावर्डेकर व २ महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद भरत मारुती सावर्डेकर यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत सावर्डेकर तसेच मारहाण करणारे चौघेजण एकाच वाडीतील शेजारी राहणारे आहेत. २२ रोजी पालवण-सावर्डेकरवाडी येथे भरत सावर्डेकर हे महेंद्र सावर्डेकर याच्या बोलवण्यावरुन त्याच्या घराजवळ गेले होते. यावेळी भरत सावर्डेकर यांनी महेंद्र याला तू माझ्या फणसाचे झाडाचे व त्या खालील दगडाचे फोठो वायरल का केलेस, तुझी बारीक नजर माझ्या घरावर आहे. या बाबीचा राग धरुन वसंत सावर्डेकर व त्या २ महिलांनी भरत सावर्डेकर याला पकडले व महेंद्र याने भरत यांना लोखंडी रॉडने डोक्यात तसेच हाता-पायासह बरगडीवर मारहाण केली. यात ते जखमी झाले आहेत. तसेचु-शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी भरत सावर्डेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.