मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; कोरे मार्गावरील २० गाड्या तीन दिवस रद्द

रत्नागिरी:- मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान ७२ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक ५, ६ आणि ७ फेब्रुवारी या कालावधीत असल्यामुळे लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस आणि काही मेल गाड्या रद्द करण्यात आल्या असून ३५० लोकल ट्रेनचाही समावेश आहे. या मेगाब्लॉकमुळे कोकणात जाणार्‍या वीस गाड्या तीन दिवस रद्द केल्या आहेत तर सहा गाड्या पनवेल येथून सोडण्यात येणार आहेत.

ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान ५ व्या लाईनवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट लाईन आणि ६ व्या लाईनवर हा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. कोकणात जाणार्‍या  सीएसटीएम करमाळी, सीएसटीएम-मडगाव, लोकमान्य टिळक-मडगाव जंक्शन, कोचिवल्ली-लोकमान्य टिळक, एर्नाकुलम-लोकमान्य टिळक, मंगळूर-मुंबई सीएसटीएम, दादर सावंतवाडी एक्स्प्रेस, दिवा-रत्नागिरी या गाड्यांच्या सतरा फेर्‍या ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीमध्ये रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच शॉर्ट टर्मिनेट केलेल्या गाड्यांमध्ये सावंतवाडी-दादर एक्स्प्रेस ३ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत पनवेलपर्यंत धावेल. तसेच मडगाव-मुंबई सीएसटीएम ही गाडी ४ ते ६ या कालावधीत, कोचिवल्ली-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस ६ फेब्रुवारीला, तिरुवअनंतपुरम-लोकमान्य टिळक ही गाडी ३ ते ६ या कालावधीत पनवेलपर्यंत धावणार आहे. तसेच मंंगळुर-लोकमान्य टिळक ही गाडी ४ ते ६ या काळात पनवेलपर्यंत धावणार आहे. दादर-सावंतवाडी (११००३), सीएसएमटी-मडगाव (१०१०३), सीएसएमटी-मंडगाव (१०१११), लोकमान्य टिळक-कोचिवल्ली एक्स्प्रेस (१२२०१), लोकमान्य टिळक-तिरुवअनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस (१६३४५), लोकमान्य टिळक-मंगळूरु (१२६१९) या गाड्या पनवेल येथून सुटणार आहेत.

रत्नागिरी ते मडगाव दरम्यान असलेल्या बोगद्यातील दुरुस्तींसाठी रत्नागिरी-मडगाव-रत्नागिरी गाडी ३१ फेब्रुवारीपर्यंत धावणार नाही. तत्पुर्वी या गाडीच्या फेर्‍या २ फेब्रुवारीपर्यंत रद्द ठेवण्यात आल्या होत्या.