देवरुख:- देवरुख एसटी आगार समस्यांच्या गर्तेत असतानाच गुरुवारी चालक तथा वाहक म्हणून कार्यरत असलेल्या संतोष राठोड याने मद्यधुंद अवस्थेत अधिकारी वर्गाशी अर्वाच्च भाषेत वर्तन केले. दारुच्या नशेत त्याने बंड्या बोरुकर यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी राठोड याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत देवरुख पोलीस ठाण्यात वाहतूक निरीक्षक कैलास साबळे यांनी फिर्याद दिली. देवरुख एसटी आगारात संतोष राठोड चालक तथा वाहक म्हणून कार्यरत आहे. राठोड हा गुरुवारी मद्यधुंद अवस्थेत होता. ड्युटी लावण्यावरून व अन्य क्षुल्लक कारणावरून त्याने अधिकारी वर्गाशी हुज्जत घातली. अर्वाच्च भाषेत वर्तन केले. राठोड याला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याची ऐकण्याची मनस्थिती नव्हती.
हा प्रकार दुपारी २ च्या सुमारास घडला. याचवेळी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर हे साबळे यांच्या दालनामध्ये काही कामानिमित्त गेले होते. यावेळी राठोड याने नशेत बोरुकर यांच्यावर हेल्मेटने हल्ला केला. यात बोरुकर यांच्या कानाला दुखापत झाली. साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष राठोड याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत वाहतूक निरीक्षक कैलास साबळे यांच्याशी संपर्क साधला असता संतोष राठोड याच्याकडून यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. आजचा घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.