मत्स्य खात्याकडून मिरकरवाडा बंदरात अचानक तपासणी मोहीम

रत्नागिरी:- सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकार्‍यांच्या पथकानी मिरकरवाडा बंदरात अचानक तपासणी मोहिम सुरू केली आहे. सागरी मासेमारी अधिनियमानुसार आवश्यक असणारी मासेमारी नौकांची मूळ कागदपत्रे तपासण्यात येत आहेत. यामध्ये मासेमारी परवाना, बंदर परवाना, नौकेवर वापरली जाणार्‍या जाळ्यांसंबंधीच्या कागदपत्रांचा समावेश आहे.

मिरकरवाडा बंदर हे जिल्ह्यातील मोठे बंदर म्हणून ओळखले जाते. केंद्राच्या अधिकारातील समुद्र क्षेत्रात म्हणजे 12 नॉटीकल मैल बाहेर  मासेमारी करण्यासाठी जाण्यास परवानगी आहे. परंतु इतक्या लांब जाऊन मासेमारी करणे खर्चिक असल्याने अनेक नौका बंदरातच आहेत. त्याचबरोबर केंद्राच्या अधिकार क्षेत्रातील समुद्रात मासेमारी करून नौका येत असतात. अशा सर्व नौकांची मूळ कागदपत्रे तपासण्यात येत आहेत.

सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त नागनाथ भादुले यांच्या आदेशानुसार शुक्रवारपासून ही कार्यवाही सुरू झाली आहे. मत्स्य व्यवसाय विभागातील अधिकारी तृप्ती जाधव, भक्ती पेजे, प्रतिक महाडवाला, स्मितल कांबळे यांच्यासह कार्यालयीन इतर अधिकार्‍यांचा या पथकात समावेश आहे. सुरक्षा रक्षकांच्या संरक्षणात ही कार्यवाही केली जात आहे.