मतदार संघातील बेरोजगारी दूर करणे माझे पहिले कर्तव्य: ना.उदय सामंत

रत्नागिरी:- राज्यातील विविध भागात परदेशातील उद्योग आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील बंद झालेले उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न आपण केला होता. त्यामध्ये आपल्याला यश मिळाले आहे. मात्र उद्योगमंत्री म्हणून स्वत: च्या मतदार संघातील बेरोजगारी दुर करणे माझे पहिले कर्तव्य आहे. म्हणूनच रत्नागिरी विधानसभा मतदार संघात येत्या काहि दिवसात १० हजार कोटींचा प्रकल्प आणणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी केली. तर खासदार विनायकन राऊत यांचा समाचार घेत , आता पुढचा खासदार कोण होतोय ते बघुच, असा टोला रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी ठाकरे सेनेचे खासदार विनायक राऊत यांना नाव न घेता दिला. वि. दा. सावकर नाट्यगृहामध्ये आयोजित शहर शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

काही लोक विनाकारण आमच्यावर टीका करत आहेत. परंतु त्या टिकेला शहरातली या गर्दीने उत्तर दिले आहे. शहर शिवसेनेचेच आहे, यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. आमच्या जिवावर निवडून आलेले आता कृतज्ञता म्हणून आमच्यावर टीका करत असतील तर त्यांना करारा जवाब मिळेल. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचा काम मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे करीत आहेत. काहीजण रत्नागिरी सकाळी बोलतात आणि रात्री आम्हाला भेटतात. परंतु आता चिंता करण्याची गरज नाही, शिवसेनेच्या मागे संपुर्ण शहर आहे. द.कोरियामधून मी चेष्टा म्हणून काही पदाधिकार्यांना सुनावले, ते एवढे पेटून उठले आणि खरंच बोललो तर विरोधकांची पळताभुई थोडी होईल असा इशारा ना.सामंत यांनी दिला.

काहीजण माझ्या विरोधात उमेदवार शोधण्यासाठी मुंबईला गेले आणि राजापूरचे उमेदवार निश्चित करून आले. काही लोक बंद दरवाजा करायचे आणि राजन साळवी किती वाईट हे ठाकरेंना सांगायचे, अशी यांची नीतिमत्ता आहे. मी जर तोंड उघडले तर अनेकांची गोची होईल. परंतु मी राजकारणात काही इथिक्स पाळतो. पण आता जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकेल पण तो आमचा. जिल्हा परिषद, पंचायत समिती आपली असले. रत्नागिरी पालिकेत पंचवीसहून अधिक आपले नगरसेवक असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणूक चार महिने आधी आहे. तेव्हाच कळेल कुणाची ताकद आहे. तोंडसुख घेण्यापेक्षा आपल्या दिव्याखाली अंधार किती आहे ते बघा. जे टीका करतात त्यांना नियती देखील माफ करणार नाहीत. अनेकांनी आम्हाला गद्दार, खोकेबहद्दर म्हणाले, आता हिम्मत असले तर अजित पावर यांच्यावर टीका करून दाखवा. शिवसेना हे आपले कुटुंब आहे, कुटुंबात दगाबाजी होणार नाही याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. विकासाला निधी कमी पडू देणार नाही. आपण विकासाच्या माध्यमातून टिकेला उत्तर देऊ, असेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा प्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, महिला जिल्हा प्रमुख शिल्पा सुर्वे, उद्योजक अण्णा सामंत, राजन शेट्ये, ॲड. संकेत घाग, श्री. सोलकर , रज्जक काझी, आदी व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.