मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा आज शुभारंभ

रत्नागिरी:- देशभरातील पाच वेगवेगळ्या मार्गांवर वंदे भारत या स्वदेशी हाय स्पीड ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी 27 जून रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ मंगळवारी सकाळी १०.३० वाजता करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील या पाचव्या वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभाची जोरदार तयारी गोव्यात मडगाव येथे करण्यात आली आहे. आज मंगळवारी होणाऱ्या उद्घाटनासाठी आठ डब्यांची नवी कोरी वंदे भारत एक्सप्रेस मुंबईहून मडगाव ला रविवारी दाखल झाली आहे.

गोवा राज्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्र राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण, मडगावचे आमदार दिगंबर कामत, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, गोवा राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस्को सार्डिन्हा आदी मान्यवर या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर गोवा – मडगाव येथे कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

यापूर्वी २ जून ला या एक्सप्रेसचे उद्घाटन होणार होते. मात्र ओरीसा येथे मोठा रेल्वे अपघात घडल्यामुळे हे उद्घाटन अचानक रद्द करण्यात आले होते.
मात्र आता तारीख ठरल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता हे उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात उत्सुकता असलेल्या अनेकांनी या गाडीच्या 28 पासून सुरू होणाऱ्या नियमित फेऱ्यांकरता आरक्षण करण्यास सुरुवात केली आहे. आज मंगळवारी 27 जून रोजी शुभारंभानंतर वंदे भारत एक्सप्रेसच्या नियमितफेऱ्या २८ जूनपासून २०२३ पासून सुरू होत आहेत. पावसाळी वेळापत्रकानुसार मुंबई मडगाव मार्गावर सोमवार, बुधवार व शुक्रवारी ही गाडी धावेल. तर मडगाव मुंबई मार्गावर मंगळवार गुरुवार व शनिवारी ही गाडी धावेल.बिगर पावसाळी हंगामात शुक्रवार वगळून ही गाडी सहा दिवस कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे.