रत्नागिरी:- शहरानजिकच्या मजगाव-केळ्ये येथील नदीपात्रात साचलेल्या गाळामुळे पावसाळ्यात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असून, येथील गाळ उपशासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. या कामाला मंजुरीही दिली आहे. त्यामुळे येथील नद्यांचा नाम फाउंडेशनकडून नुकतेच सर्वेक्षूण करण्यात आले.
रत्नागिरीतील मजगाव, केळ्ये पुलाजवळ नदीपात्रात गाळ साचल्यामुळे पावसाळ्यात अनेकवेळा पूरस्थितीमुळे केळ्ये म्हामूरवाडीची रत्नागिरीकडे होणारी वाहतूक बंद होत असते. येथील ग्रामस्थांना अनेकवेळा वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या स्थितीमुळे कधी कधी रुग्णांना रत्नागिरीत घेऊन जाणेही कठीण होऊन जाते. तसेच आजूबाजूच्या शेतात पाणी शिरत असल्याने शेतीचे नुकसान होत
असते.
गणपती विसर्जनावेळी समस्यांना सामोरे जावे लागते. नदीपरिसरातील आजबाजूंच्या घरात पाणी शिरून घरातील साहित्याचे नुकसान होते. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नदीपात्रातील पाणीसाठाही कमी होतो. त्याचा परिणाम मजगाव, केळ्ये नळपाणी योजनेच्या विहिरीला बसून पाणीटंचाई समस्येला सामोरे जावे लागते.
याबाबत मजगाव सरपंच फैयाज मुकादम तसेच सदस्यांनी पालकमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख महेश म्हाप यांच्या ही बाब लक्षात आणून दिली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे गाळ उपशाचे काम अखेर मंजूर झाले आहे.
पवारवाडी, म्हामूरवाडी, साकवाजवळचा गाळ काढणे तसेच माहिगीर मोहल्ला ते मिस्त्री बागपर्यंत नदीचा गाळ काढणे गरजेचा असल्याने ही बाब मजगाव सरपंच फैयाज मुकादम, केळ्ये माजी सरपंच महेश धावडे यांनी निदर्शनास आणून दिलेली होती. अखेर पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी या नदीचे सर्वेक्षण केले. या दोन्ही कामांना मंत्री सामंत यांनी मंजुरी दिली आहे.