मच्छी विक्रेत्या महिलेच्या खून प्रकरणी तरुणाला अटक 

रत्नागिरी:- मासे विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या खून प्रकरणात २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणात जयेश गमरे याला अटक करण्यात आली असून या तरुणाने दगडाने ठेचून सईदा सय्यद हीची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

दि. १५/०२/२०२३ रोजी सकाळी ७.०० वा ते दुपारी ३.०० वा चे दरम्याने, तारवाशेत पिरंदवणे, संगमेश्वर येथील जंगलमय पायवाटेवरून वाड्या व गावांमध्ये किरकोळ मासे विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सईदा रिझवान सय्यद (रा. हनुमान नगर, मधली वाडी, संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी) हिला एका अज्ञात व्यक्तीने मारहाण करताना तिच्या डोक्याला गंभीर इजा करून तिला जीवे ठार मारून तिचे प्रेत जंगलामध्ये काही अंतरावर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने नेऊन टाकले होते.

मासे विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलेचा खून होताच संगमेश्वर व परिसरामध्ये तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. हा अपघात की घातपात याबाबत तपास सुरू झाला होता.

या संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या गुन्ह्याची उकल करण्याकरिता, संगमेश्वर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त पथक तयार करण्याचे निर्देश दिले.

त्याप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री गायकवाड तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी  सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. झावरे, संगमेश्वर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक  हेमंतकुमार शहा, स्था. गु. शा. रत्नागिरी व संयुक्त पथकाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला व काही दिवसांच्या आतच म्हणजे, दिनांक २०/०२/२०२३ रोजी गुप्त माहितीच्या आधारे पिरंदवणे बौद्धवाडी येथे राहणारा २३ वर्षीय युवक जयेश रमेश गमरे यास ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र त्याने हा खून का केला याबद्दलची माहिती पोलिसांनी दिलेली नाही.

आरोपी जयेश रमेश गमरे याने, मासे व्यावसायिक सइदा रिझवान सय्यद, रा. हनुमान नगर, मधली वाडी, संगमेश्वर हिची दगडाने ठेचून हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून त्यास दिनांक २१/०२/२०२३ रोजी ४.३० वा अटक केली असून त्यास २४/०२/२०२३ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

ही कारवाई,  हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा रत्नागिरी व पोलीस अंमलदार तसेच उदय झावरे, पोलीस निरीक्षक संगमेश्वर पोलीस ठाणे व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.