मच्छीमारी नौकांवर आता ‘एआयएस’ सिस्टीम बसवणार: पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते 

रत्नागिरी:- कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षा अजूनही भक्कम करण्याची गरज आहे. काही जमेच्या तर काही तोट्याच्या बाजू लक्षात आल्या. त्यात सुधारणा करण्यासाठी नौदल, कोस्टगार्ड आणि पोलिस यांची नुकतीच बैठक झाली. मच्छीमार हाच सर्वांत मोठा इंटलेजन्ट असून त्याच्याकडुन किनारपट्टीवरील बारीक-सारीक हालचालींची माहिती मिळते. म्हणून किनारट्टीवरील सर्व मच्छीमारी नौकांवर आता ‘एआयएस’ (अॅटोमेटेड आयडेंटी फिकेशन सिस्टीम) ही यंत्रणा बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व लॅंडिंग पॉइंटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती कोकण परीक्षेत्र पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पोलिस दलाची तयारीची आढावा बैठक घेण्यासाठी रत्नागिरी  दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारीक चर्चेवेळी ते बोलत होते. श्री. मोहिते म्हणाले, रायगडमधील हरिहरेश्वर येथील भरकटत आलेल्या नौकेचा तपास लगेच झाला. परंतु यानिमित्ताने सागरी सुरक्षेचा प्रश्न
एरणीवर आला. कोकणातील सागरी सुरक्षा अजूनही भक्कम करण्याची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही तत्काळ नौदल, तटरक्षक दल आणि पोलिस दलाची बैठक घेतली. या बैठकीत समुद्रातील हालचालीची माहिती वेगाने सुरक्षा यंत्रणेला मिळण्यासाठी काय करता येईल, याचा विचार झाला. समुद्रात हजारो मच्छीमारी नौका मासेमारीसाठी दिवस, रात्र असतात. यातील परकीय किंवा घुसखोरी करणारी नौका कोणती हे समजने कठीण आहे. म्हणून प्रत्येक मच्छीमारी नौकांवर एआयएस ही यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. यामुळे त्या-त्या बोटीच्या समुद्रातील मार्ग ट्रॅक करता येतो. परंतु बहुतेक नौकांवर एआयएस ही यंत्रणाच नाही. ही गंभीर बाब असून मेरीटाईम बोर्डाकडुन सर्व मच्छीमारी
नौकांवर एआयएस यंत्रणा बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. समुद्रातील माहिती देणारा सर्वांत इंटलेजन्ट माणूस हा मच्छीमार आहे. त्यावर अधिक लक्ष देण्यात येणार आहे.

किनाऱ्यावरील घुसखोरी रोखण्यासाठी सर्व लॅंडिंग पॉइंटवर सुरक्षा रक्षक नेण्यात आले आहेत. परंतु  त्यांनी ड्रेसकोड, ओळखपत्राचा प्रश्न आहे. म्हणून महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडुन हे सुरक्षा रक्षक नेमून त्यांच्याकडुन थेट सुरक्षा यंत्रणेला माहिती मिळावी, यासाठी काम सुरू आहे. एवढेच नाही, तर प्रत्येक लॅंडिंग पॉइंटवर सीसी टीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहे. यापूर्वीच्या काही घटनांचा विचार करता सागरी सुरक्षा अधिक मजबूत आणि तगडी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे श्री. मोहित यांनी सांगितले.