रत्नागिरी:- अलिबाग कोळीवाडयातील मच्छीमारांकडून मासळी घेऊन त्यांना तब्बल दीड कोटी रूपयांचा गंडा घालणाऱ्या राजापूर-नाटे येथील व्यापाऱ्याला अलिबाग पोलीसांनी थरारक पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. नायब मजिद सोलकर असे त्याचे नाव असून न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
नायब सोलकर हा राजापूर तालुक्यातील नाटे गावचा रहिवासी आहे. घाऊक मासे खरेदी करणारा व्यापारी असल्याचे भासवून त्याने अलिबाग कोळीवाड्यातील मच्छीमारांकडून मासळी खरेदी केली. मार्च २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत त्याने खरेदी केलेल्या मासळीची किंमत १ कोटी ५२ लाख रूपये इतकी आहे. मासे खरेदी केल्यानंतर तो पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. मच्छीमारांनी त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला परंतु तो काही पैसे देण्याचे नाव घेईना. अखेर फसवणूक झालेले मिथुन लक्ष्मण सारंग, रणजित भगवान खमीस, प्रदोश गोरखनाथ तांडेल, विशाल हरिश्चंद्र बना यांनी अलिबाग पोलीस ठाणे गाठून फसवणूकीची तक्रार दिली. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करून नायब याचा तपास सुरू केला.
गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे ५ महिन्यापासून आरोपी नायब फरार होता. त्याने आपला मोबाईल देखील बंद ठेवला होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक, अभिजीत शिवथरे व अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी, विनीत चौधरी यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे तसेच अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या सूचनेनुसार या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी करीत होते. सुर्यवंशी यांनी सायबर सेलच्या मदतीने तांत्रीक तपास करून माहीती प्राप्त घेतली. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी आरोपी नायब हा मुंबई येथुन रत्नागिरी येथे जाणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली. पोलीस पथकाने त्याच्या कारचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. नायब मजिद सोलकर याची चौकशी करून त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या गुन्ह्याच्या तपासात हनुमंत सुर्यवंशी यांना हवालदार अतुल जाधव यांनी सहकार्य केले.