रत्नागिरी:- मंदिरांवरील बंदी राज्य शासनाने उठवल्यानंतर मंदिरे खुली केली जावीत अशी मागणी भक्तगणांकडून होत आहे. त्यावर निर्णय झाला नसला तरीही ऑक्टोबर महिन्यात मंदिरे खुली केली जातील अशी शक्यता आहे. दर्शनासाठी मंदिर खुले केल्यास गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान राहणार आहे. त्यावर उपाययोजना म्हणून त्या ठिकाणांवरील कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागणार आहे. तसेच दररोज दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणीचा पर्याय व्यवस्थापनांकडून सुचविला जात आहे.
कोरोनामुळे सहा महिने घरात बसलेले नागरिक मंदिरे सुरु झाल्यास दर्शनासह पर्यटनाला बाहेर पडण्याची शक्यता आहे. सध्या गणपतीपुळे सारख्या ठिकाणी दररोज शंभरहून अधिक लोकं येत आहेत. त्यामुळे मंदिरे सुरु केल्यानंतर कोरोना पसरु नये याची मोठी जबाबदारी आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याचे आव्हान मंदिर व्यवस्थापनापुढे राहणार आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे यासारख्या गोष्टींचा वापर वाढवावा लागेल. गर्दी नियंत्रणासाठी मंदिरात येणार्यांसाठी ऑनलाईन नोंदणीचा फंडा यशस्वी ठरु शकतो. दररोज दर्शनासाठीची मर्यादा ठेवून त्यांच्या वेळा निश्चित करता येऊ शकतात. मोठी गर्दी असलेल्या ठिकाणी या पध्दतीने अवलंब केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. कोरोनासाठी जाहीर केलेले कंटेनमेंट झोनमध्ये मंदिर परिसर असल्यास त्यादृष्टीने नियमांची कोटकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यासाठी मंदिर व्यवस्थापनाला तयारी करावी लागेल.
जिल्हा बंदी उठल्यानंतर एसटी, रेल्वे टप्प्याटप्प्याने सुरु होत आहेत. पर्यटनस्थळांवर गर्दी होऊ नये, म्हणून मंदिरे बंदच आहेत. हॉटेल, लॉज सुरु असले तरीही मंदिरे सुरु होत नाहीत, तोपर्यंत पर्यटन व्यावसायाला चालना मिळणार नाही. दसर्यापुर्वी मंदिरे दर्शनासाठी खुली होतील अशी आशा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे, पावस येथील स्वामी स्वरपानंद समाधी, गणेशगुळे मंदिर, राजापूरमधील आडीवरेची महालक्ष्मी, सुर्यमंदिर, चिपळूणातील परशुराममंदिर, देवरुखमधील मार्लेश्वर यासारखी मोठमोठी प्रसिध्द देवस्थानं बंदच आहेत. जिल्हा बंदी उठल्यानंतर अनेक भक्तगण मंदिर परिसरात येऊन कलश दर्शनावर समाधान मानत परत जातात. गणपतीपुळेत दरवर्षी दहा ते पंधरा लाख पर्यटकांची नोंद होते. त्यातून होणार्या पर्यटन व्यावसायाचील उलाढाल काही कोटींच्या घरात आहे. ती थांबल्यामुळे हजारो लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन थांबले आहे.