मंत्रीपदाच्या कालावधीत घेतलेले निर्णय रत्नागिरीसाठी फलदायी: सुरेश प्रभू

रत्नागिरी:- मी रत्नागिरीचा खासदार नसलो तरी रत्नागिरीसोबत माझे भावनिक नाते आहे. रत्नागिरीच्या विकासासाठी मंत्रीपदाच्या कार्यकाळात आपण महत्वपूर्ण निर्णय घेतले आणि या निर्णयामुळेच अनेक प्रकल्प मार्गी लागले. त्यातील रत्नागिरी व सिंधुदुर्गचे विमानतळदेखील असल्याचे माजी मंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू हे रत्नागिरी दौर्‍यावर आले होते. मंगळवारी भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष सुशांत चवंडे, सरचिटणीस उमेश कुळकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रभू यांनी रत्नागिरीसोबत आपले भावनिक नाते असल्याचे सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोरोनाचे महाभयंकर संकट आले होते. आता तर युकेमध्ये नवीन व्हायरस फोफावला आहे. हा व्हायरस आपल्याकडे येऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज आहे. जगातील सर्वात जास्त प्रमाणात लस निर्मिती ही भारताने केली असून लसीकरणानंतर देशातील कोरोना पूर्णपणे आटोक्यात येईल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच कोरोनाच्या कठीण काळात जगभरातून भारताकडे औषधांची मागणी झाली. अनेक देशांना भारताने औषधदेखील पुरवली असल्याचे प्रभू यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांचादेखील आढावा घेतला. मुंबई-गोवा महामार्गाबाबत बोलताना ते म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत २९ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाबाबत चर्चा होऊन काही निर्णयदेखील झाल्याचे ते म्हणाले.
नागरी उड्डाणमंत्री असताना रत्नागिरी व सिंधुदुर्ग विमानतळासाठी जे निर्णय घेतले त्यातून दोन्ही विमानतळ सुस्थितीत आली आहेत. रत्नागिरीसाठी अन्य काही गोष्टींची आवश्यकता आहे. मात्र दोन्ही विमानतळे उडाण योजनेत समाविष्ट केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले की, याबाबत सरकार व शेतकरी यांच्यात चर्चा सुरू आहे. आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हिताचेच निर्णय घेतले आहेत. पूर्वी शेतकर्‍यांना मनिऑर्डरची वाट पहावी लागत होती. आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत, असे सांगून स्मार्ट शेतकरी व आधुनिक शेतकरी निर्माण करण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करीत असल्याचे प्रभू यांनी सांगितले.