‘भैय्या आता बस्स झाल्या भेटीगाठी, तुम्ही निर्णय घ्या’

शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक;किरण सामंतांच्या निर्णयाकडे लक्ष

रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. भाजपातर्फे केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणे यांनी प्रचार सुरु केला आहे. तर शिवसेनेतून इच्छूक असलेले मंत्री ना.उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे रविवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागपूरला गेले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. ‘भैय्या आता बस्स झाल्या भेटीगाठी, तुम्ही निर्णय घ्या’, ‘आपण अपक्ष लढूया, नंतर ठरवू काय कराचे’, ‘आम्ही तयार आहोत, तुम्ही आदेश द्या’ ‘तुम्हाला निवडूण आणण्याची जबाबदारी आमची’अपक्ष उभे राहून आपली ताकद दाखवूयात असे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे किरण सामंत कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली असूनही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. या मतदार संघात भाजपाने कमळ चिन्ह घराघरात पोहचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतू याठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे. राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी शिवसेनेत शिंदेबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही याठिकाणी त्यांना मोठा पाठिंबा मिळाला आहे.

मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या प्रभावी कामाबाबत सर्वच स्तरावर चर्चा होत असते. या कामाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात आपले जाळे विणले आहे. मागील सहा‚सात महिन्यांपासून लोकसभेची तयारी करताना रत्नागिरी‚सिंधुदुर्गमध्ये कार्यकत्यांची मजबूत फळी त्यांनी उभी केली आहे. भावी खासदार म्हणून त्यांच्या कार्यकर्ते पहात आहेत. परंतु मतदार संघाच्या वाटाघाटीत अद्यापही महायुतीने येथील उमेदवार जाहीर केलेला नाही.

मागील काही दिवसांपासून किरण सामंत यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांच्याही भेटीगाठी घेतल्या आहेत, परंतु त्यातून मार्ग निघालेला नाही.त्यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा हे रविवारी विदर्भाच्या दौर्यावर येत असल्याने, किरण सामंत यांनी नागपूरला जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गृहमंत्री शहा यांची भेट घेणार आहेत.किरण सामंत यांच्यावर लोकसभेला उभे राहण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. जर पक्षाने तिकीट दिले नाही तर अपक्ष म्हणून उभे रहावे यासाठी कार्यकर्ते त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले आहेत. त्यांना निवडूण आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर किरण सामंत कोणाता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.