भूमिगत वीजवाहिन्यांचा प्रकल्प अंतिम टप्प्यात

रत्नागिरी:- किनारपट्टी भागातील ओव्हरहेड (विद्युतखांबांवरील वाहिन्या) उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या भूमिगत करण्याच्या रत्नागिरी शहरातील पथदर्शी प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सध्या मिऱ्याबंदर आणि झाडगाव भागात भूमिगत विद्युतवाहिनीतून वीजपुरवठा सुरू झाला आहे. ९७ कोटीचा हा प्रकल्प आहे.

१६ पैकी १३ रोहित्र बसवण्यात आली आहेत. उर्वरित किनाऱी भागातील भूमिगत विद्युत पुरवठा ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरू होईल, असा विश्वास ठेकेदार कंपनी लिना पॉवर टेक इंजिनिअरिंग प्रा. लि. ने व्यक्त केला आहे. समुद्रकिनारी भागामध्ये वारंवार होणाऱ्या चक्रीवादळांमुळे किनापट्टी भागात महावितरण कंपनीचे प्रंचड नुकसान होत आहे. विद्युतखांब कोलमडणे, वाहिन्या तुटणे, रोहित्र खराब होणे अशा अनेक समस्यांना कंपनीला तोंड द्यावे लागत होते तसेच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होऊन ग्राहकांची गैरसोय होत होती. तसेच मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने शासनाने किनारपट्टी भागातील ओव्हरहेड उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या भूमिगत करण्याचा प्रकल्प हाती घेतला. रत्नागिरी शहरासह पालघर आणि अलिबाग या शहरांचा यात समावेश होता. रत्नागिरी शहराच्या ९७ कोटीच्या प्रकल्पाला २०१९ मध्ये शासनाने मंजुरी दिली होती; परंतु कोरोना महामारीमुळे हे काम रखडले होते.

रत्नागिरी शहराच्या किनारी भागात उच्च दाब वाहिन्यांचे १०४.३५ किमीचे काम होते तर लघुदाब वाहिन्यांचे ३१५.२५ किमीचे काम होते. हे काम पूर्ण झाले आहे तर एकूण १६ रोहित्र बसवण्यात येणार होती. त्यापैकी आतापर्यंत १३ बसवून पूर्ण झाली आहेत. ३ रोहित्रांचे काम प्रगतिपथावर आहे. मिऱ्या बंदर आणि शहरातील झाडगाव येथील विद्युत पुरवठा भूमिगत विद्युतवाहिन्यांच्या माध्यमातून सुरू झाला आहे. उर्वरित काम अंतिम टप्प्यात असून, ३१ ऑक्टबरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास ठेकेदार कंपनीने व्यक्त केला आहे.