रत्नागिरी:- उन्हाळ्यात भेडसावणारी संभाव्य पाणी टंचाई आणि घटणारी भूजल पातळी रोखण्यासाठी पाण्याचे ऑडिट करण्यात येणार आहे. त्याकरिता अटल भूजल योजनेअंतर्गत पाणी पातळी तपासणीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवविताना भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत गावातील भूजल पातळीचा अभ्यास करताना ग्रामपंचायतस्तरावर भूजल मापक यंत्र बसविण्यात येणार आहे.
ही योजना शहरात प्रभाग स्तरावर आणि गावात वाडी वस्तीवर राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 100 गावात यंत्र बसविण्यासाठी पॉईंटची निश्चिती करण्यात आली आहे. पावसाळ्यात समुद्राला जाणारे पाणी आणि अतिरिक्त उपशाने भेडसावणारी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात अटल योजने अंतर्गत पाण्याचा ताळेबंद मांडण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून अत्याधुनिक पद्धतीने गावातील भूजल पातळीचा अभ्यास करण्याकरिता जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर 100 गावात भूजल मापक यंत्राचे पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. या स्थळावर यंत्रे बसविल्यानंतर येथील जलपातळीवर होणारे परिणाम अभ्यासता येणार आहे.
तसेच त्यावर उपायही करता येणार आहे. यामुळे गावात भूजल पातळीची नोंद दर 12 तासाला घेता येणार असून, पर्जन्यमापक यंत्र व भूजल मापक यंत्राचा उपयोग करुन गावातील पाण्याचे नियोजन करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल पुनर्भरण, जलसंधारण, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाण्याची बचत करण्याचे विविध उपाय लोकसहभागातून करण्यात येणार असल्याचे प्रस्तावीत आहे. प्रत्येक गावाचा जलसुरक्षा आराखडा तयार करून कृषी, महसूल, जलसंधारण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सिंचन विभाग आदी शासकीय विभाग व लोकसहभाग यांच्या समन्वयाने गावाचा विकास करण्याची अभिनव पद्धती या योजनेतून साकारण्याचा शासनाचा मानस असून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.