भास्कर जाधव तुमच्या सभांमध्ये येऊन तमाशा करू: अविनाश जाधव

रत्नागिरी:- आमदार भास्करशेठ जाधव शिल्लक सेनेचे नेते आहेत. तुम्ही आमच्या नेत्याच्या वाटेला जाऊ नका. राजसाहेब तुमच्या नेत्यांना काहीही बोलत नाहीत. तुम्ही विनाकारण आमच्या राजसाहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलात तर मनसेचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. याद राखा आमच्या वाटेला गेलात तर, तुमच्या भर बैठकांमध्ये येऊन तमाशा करू असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते भास्करशेठ जाधव यांना दिला आहे. त्यामुळे उबाठाविरूद्ध मनसे म्हणजे संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीला आलेल्या श्री.अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत आमदार भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो पक्ष स्थापन केला, मोठा केला, नावारूपाला आणला, सत्ता मिळवली, त्याच बाळासाहेबांचा मुलगा धोंडा निघाला आहे. शिवसेनेतले आमदार एकेक करून सोडून जात आहेत. असे असताना शिल्लक सेनेचे आमदार भास्करशेठ जाधव हे विनाकारण राजसाहेबांना टार्गेट करत आहेत. मनसैनिक पेटून उठला तर आ.भास्कर जाधव यांना फिरणे कठीण होईल असे श्री.जाधव यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला दिला आहे. आम्ही सर्व ठिकाणी बैठका घेऊन कार्यकर्त्यांना महायुतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा, तालुका पदाधिकारी मनसे पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मनसे सोबत असल्यामुळे मंत्री ना.नारायणराव राणे यांचा विजय निश्चित झाल्याचा दावा श्री.जाधव यांनी केला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे सुनिल तटकरे हे विजयी होतील. मनसेनेते वैभव खेडेकर हे त्यांच्यासोबत प्रचारात सक्रीय होणार आहेत. जुने मतभेद विसरून नव्याने मनसे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. राज्यभरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीला साथ दिल्यामुळे महायुतीचा विजय निश्चित आहे. होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेचा केवळ खासदार निवडून येणार असल्याचे श्री.जाधव यांनी सांगितले.


रामदासभाई कदम-वैभव खेडेकर यांचे होणार मनोमिलन
शिवसेनानेते रामदास कदम व मनसे नेते वैभव खेडेकर यांच्यातील राजकीय संघर्ष जिल्ह्यासह कोकणाला माहीत आहे. वैभव खेडेकर यांना तुरूंगात पाठविण्यापर्यंत हा संघर्ष वाढला होता. अशातच श्री.राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने रामदास कदम, खासदार सुनिल तटकरे यांच्यासमवेत काम कसे करायचे? असा प्रश्न मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थित केला होता. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रामदासभाई कदम व वैभव खेडेकर यांची संयुक्त बैठक होणार असून या बैठकीत गुरू-शिष्य असलेल्या व आता कट्टर विरोधक बनलेल्या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन होणार का? याकडेच मनसे कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.