भावनिक आवाहनाला विसरा, विकासाचा विचार करा: ना. चव्हाण

रत्नागिरी:- लोकसभेची निवडणूक असल्याने येणारा प्रत्येक नेता आता भावनिक आवाहन करेल, त्यामुळे भावनिक आवाहनांना बळी न पडता येणार्‍यांना कोकणासाठी काय केले हे विचारण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसला पासष्ट वर्षात जे जमले नाही ते मोदींनी 10 वर्षात करुन दाखवले त्यामुळे पुढील 35 दिवसात मोदी मॅजिक घराघरात गेले पाहीजे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

भाजपातर्फे आयोजित बुथ कार्यकर्त्यांच्या सुपर वॉरियर्स संमेलनात ते बोलत होते. स्वा. सावरकर नाट्यगृहात हे संमेलन पार पडले. याला माजी खासदार निलेश राणे, देवगडचे आमदार नितेश राणे, भाजपाचे लोकसभा प्रभारी प्रमोद जठार, सहप्रभारी माजी आम. बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण-संगमेश्वर, रत्नागिरी-संगमेश्वर, लांजा-राजापूर या तीन विधानसभा मतदार संघातील बुथ कार्यकर्त्यांना अवघ्या बारा तेरा तासापूर्वी केलेल्या सूचनानंतर एवढे पदाधिकारी संमेलनाला उपस्थित राहिल्याबद्दल मंत्री चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी बोलताना ते म्हणाले, दीड वर्षात रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील रस्ते व अन्य कामांसाठी बांधकाम विभागाकडून तब्बल साडेपाच हजार कोटी रुपये देण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना देवगडचे आमदार नितेश राणे म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्गवासियांचा मागील दहा वर्षापासूनचा वनवास आता संपवायचा आहे. दहा वर्षात येथील खासदारांनी काय केले, हे कळलेच नाही. या मतदार संघाला मोठी ईतिहास आहे. महायुतीच्या उमेदवाराला देशातील पहिल्या पाच उमेदवारांमध्ये येथील उमेदवार असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, लोकसभा निवडणूक ही संपूर्ण देशाची निवडणूक आहे. मागील दहा वर्ष येथील लोकांची फुकट गेली आहेत. आणखी पाच वर्ष जाऊ नयेत याची काळजी जनतेने घ्यायची आहेत. कोकण रेल्वेचा डबल ट्रॅक, टर्मिनल, विमानतळ हे केंद्राचे प्रश्न असून ते झालेले नसल्याची टिकाही निलेश राणे यांनी केली. माजी भाषा चुकत असेल परंतु मातीसाठी बोलणारा माणूस असल्याचेही राणे यांनी सांगितले.