भाट्ये पुलावरून उडी घेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

रत्नागिरी:-प्रतिभा आश्रमात ठेवलेल्या महिलेने भाट्ये पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र नजिकच्या ग्रामस्थांचे लक्ष गेल्याने त्यांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या आणि त्या महिलेला सुखरूपपणे बाहेर काढले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्रतिभा आश्रमात ठेवलेली महिला येथील कर्मचार्‍यांचे लक्ष चूकवून आश्रमातून पळाली आणि एकच खळबळ उडाली. आश्रमात असलेली महिला पळाल्याचे लक्षात आल्यानंतर आश्रमातील 2 महिला कर्मचारी तिच्या मागावर धावत सुटल्या. आश्रमातून बाहेर आल्यानंतर त्या महिलेने सरळ भाटे ब्रीज गाठला आणि थेट पूलावर उभे राहून त्या महिलेने पुलावरून पाण्यात उडी मारली.

महिलेने पाण्यात उडी मारल्याचे नजिकच्या परिसरातील ग्रामस्थांनी पाहिले आणि अनेक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. काहींनी तर पटापट पाण्यात उड्या घेतल्या. स्वत:चा जीव धोक्यात घालून भर पावसात अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली होती. या महिलेला ग्रामस्थांनी पाण्यातून बाहेर काढले.