भाट्ये खाडीत बुडून कोकण नगर येथील दोघांचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये खाडीत बुडून दोघांचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ही दोन्ही मुले खेकडे आणि मच्छी पकडण्यासाठी भाट्ये येथे गेले असता ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार कोकण नगर, रत्नागिरी येथे राहणारा प्रणय जाधव (वय २४) व रेहान शेख (वय ११) हे दोघे भाट्ये पुलाखाली पोहण्यासाठी उतरली. या ठिकाणी समुद्राचे पाणी खाडीत येण्याचा मार्ग असल्याने वाळू कापली जाते व अचानक खोल खड्डा तयार होतो. नेमके याच ठिकाणी हि दोन मुले पोहण्यासाठी उतरली. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले. त्यांच्यासोबत गेलेल्या अन्य एका मुलाने आरडाओरडा केल्यावर आजूबाजूच्या परिसरात जाळे विणत असणाऱ्या मच्छिमारांनी धाव घेत या दोघांना बाहेर काढले. अत्यवस्थ अवस्थेत दोघांना जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र पोटात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेबाबत माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या दोन लहान मुलांच्या मृत्यूमुळे कोकण नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.