रत्नागिरी:- भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातील गाळाचा प्रश्न गेली कित्येक वर्षे जैसे थे आहे. याबाबत जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छिमार संघर्ष समितीने पालकमंत्री उदय सामंत यांची पाली येथे भेट घेतली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी हा गाळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मेरिटाईम बोर्डसोबत फेब्रुवारी, 2023 मध्ये मुंबईच बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले. मुंबईतील बैठकीला मच्छिमार संघर्ष समितीचे पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
शहराजवळील राजिवडा कर्ला, भाट्ये आणि फणसोप या परिसरातील मच्छिमारांना या गाळाची समस्या जाणवत आहे. समुद्रात ये जा करण्यासाठी भाट्ये खाडीचे मुख असलेले मांडवी जेटीसमोरून जाणारा एकमेव मार्ग आहे. परंतु हा मार्ग गाळाने भरलेला असतानाच मोठ-मोठे खडकही येथे आहेत. त्यामुळे हा मार्ग मच्छिमारांसाठी धोकादायक ठरत आहे हा मार्ग गाळाने भरलेला व खडक असल्याने अनेकदा येथे नौकांना अपघात झालेले आहेत. त्यामध्ये काही मच्छिमारही दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. तीन महिन्यापूर्वी नौका बुडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे.
हा गाळ उपसण्यात यावा, अशी मागील 20 ते 25 वर्षापासून मच्छिमारांची मागणी आहे. मात्र, शासनाकडून याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. वेळोवेळी शासन दरबारी निवेदने देण्यात आली. हा गाळ लवकरात लवकर उपसून पुढील मासेमारी मोसमात तरी हा मार्ग मोकळा मिळेल, अशी आपेक्षा मच्छिमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.