भाट्ये खाडीतील गाळ उपसून बंधारा बांधण्याची मागणी

रत्नागिरी:- भाट्ये खाडीचे मूख असलेल्या मांडवी बंदरात साचलेल्या गाळाची समस्या राजीवडा, कर्ला, भाट्ये आणि फणसोप या परिसरातील मच्छीमारांना सतावत आहे. हा प्रश्न सुटावा यासाठी जमातुल मुस्लिमीन राजीवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीने निमंत्रित केलेल्या बैठकीला 200हून अधिक संख्येने मच्छीमार उपस्थित होते. गाळ उपसणे व बंधारा बांधण्याबाबत मागणी करण्यात आली.

चार गावातील मच्छीमार सध्या भाट्ये खाडीच्या मुखाशी साचलेल्या गाळाच्या गंभीर समस्येला तोंड देत आहेत. खोल समुद्रातून मासेमारी करून परतत असताना किंवा समुद्रात मासेमारीसाठी जात असताना त्यांना भरती-ओहोटीची प्रतीक्षा करावी लागते. तसेच अनेकदा या गाळामध्ये मासेमारी नौका अडकून झालेल्या अपघातात मच्छीमार दगावल्याच्या आणि नौका बुडाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
 याबाबत मागील 20 ते 22 वर्षांपासून या चारही गावातील मच्छीमार आपल्या परीने शासनाला निवेदने देऊन गाळ उपसा तसेच बंधारा बांधण्याबाबत मागणी करत राहिले. मात्र, त्याकडे प्रशासनाकडून कायम दुर्लक्ष होत राहिल्याने या गाळाची समस्या गंभीर बनली आहे. याबाबत मच्छीमार संघर्ष समितीने राजीवडा गावामध्ये चारही गावातील मच्छीमारांची सभा बोलावली होती.
 

या सभेला मच्छीमार संघर्ष समितीचे नजीर वाडकर, शब्बीर भाटकर, दरबार वाडकर, माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी इम्रान सोलकर, गालिब मुकादम, जहूर बुड्ये, महंमद सईद फणसोपकर, रहिम दलाल, शफी वस्ता व अन्य सुमारे 200 मच्छीमार उपस्थित होते. यावेळी उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी गाळाची समस्या जाणून घेतली असून, ती सोडविण्याचे आश्वासन दिल्याचे संघर्ष समितीकडून स्पष्ट करण्यात आले.