रत्नागिरी:- शहरातील भाटकरवाडा येथील गतिरोधक काढल्यावरून संतप्त नागरिक पालिकेवर धडकले. तो एकच गतिरोधक का काढला, काढायचे असतील तर सर्व का काढले नाही? असा जाब नागरिकांनी पालिकेला विचारला; परंतु पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
आरटीओमार्फत तेथे पुन्हा सर्व्हे करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे पालिकेने आश्वासन दिल्यानंतर जमाव पांगला. शहरातील भाटकरवाडा येथे रस्त्यालगत असलेल्या वस्तीमुळे जवळजवळ दोन गतिरोधक टाकण्यात आले आहेत. त्यापैकी एका गतिरोधकाजवळच गटाराचे काम झाले आहे. या कामाची उंची वाढल्यामुळे गतिरोधकाला लागूनच त्या उंचीचे गटार झाले आहे. याबाबत पोलिसांनी केलेल्या सूचनेवरून, पालिकेच्या पथकाने गटाराजवळचा गतिरोधक काढून टाकला; परंतु यावरून चांगला गोंधळ निर्माण झाला. भाटकरवाडा येथील हा एकच गतिरोधक का काढण्यात आला, यावरून नागरिकांमध्ये चलबिचल सुरू झाली.
त्या भागातील शेकडो नागरिक गोळा झाले आणि शुक्रवारी सकाळी पालिकेवर धडकले. एकच गतिरोधक काढण्याचे कारण काय, काढायचे असलील तर सर्वच गतिरोधक काढा, असे नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले. दरम्यान, तेथे पोलिसदल दाखल झाले. सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर याबाबत लेखी निवेदन देण्याची सूचना पालिकेने ग्रामस्थांना केली. याबाबत आम्ही उपविभागीय प्रादेशिक अधिकारी (आरटीओ) यांना कळवतो. त्यांच्यामार्फत या भागाचा सर्व्हे केला जाईल. सूचनेनुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले. नागरिकांचे समाधान झाल्यानंतर नागरिक तेथून पांगले.