निरीक्षकांनी घेतल्या मुलाखती ; माने समर्थकांची वर्णी शक्य
रत्नागिरी:- भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी तालुकाध्यक्ष पदासाठीच्या मुलाखती नुकत्याच झाल्या. या पदासाठी तिघेजणं इच्छुक असून त्यामध्ये सुयोग उर्फ दादा दळी, विवेक सुर्वे, भाई जठार यांचा समावेश आहे. यामधून लवकरच निवड केली जाणार आहे.
भाजपच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अॅड. दिपक पटवर्धन यांच्यानंतर राजेश सावंत यांची वर्णी लागली. माजी आमदार बाळ माने यांच्याकडे विधानसभा क्षेत्राध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली. अॅड. पटवर्धन जिल्हाध्यक्षपदी आल्यानंतर बाळ माने भाजपच्या प्रमुख कार्यक्रमातून दूरावलेले दिसत होते. जिल्हाध्यक्ष बदलानंतर पुन्हा माने यांचा बोलबाला सुरु झाला आहे. तेही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तळागाळात जाऊन संघटना वाढीसाठी फिरत आहेत. जिल्हाध्यक्ष बदलानंतर रत्नागिरी तालुका आणि शहराध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुकाध्यक्षपदी मुन्ना चवंडे हे होते. नवीन पदाधिकारी नियुक्तीसाठी 22 ऑगस्टला रत्नागिरीत मुलाखती घेण्यात आल्या. त्यावेळी संघटनमंत्री शैलेश दळवी, प्रभारी महेश जाधव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग प्रभारी अतुल काळसेकर उपस्थित होते.
तालुकाध्यक्षपदासाठी चांदेराईचे दादा दळी, जयगडचे विवेक सुर्वे आणि निवळीचे भाई जठार यांची इच्छुक उमेदवारांमध्ये नावे आहेत. दादा दळी हे चांदेराई ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्यरत होते. तसेच संघटनेच्या माझी माती, माझा देश हा कार्यक्रम तळागाळात पोचवण्यासाठी भाजपकडून नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा संघटकामध्ये दळवी यांची नियुक्ती केली होती. त्यांनीही नियोजनबध्द काम करत रत्नागिरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये बाळ माने आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली माझी माती, माझा देश उपक्रमाच्या बैठका यशस्वी केल्या होत्या. तर विवेक सुर्वे हे माजी पंचायत समिती सदस्य आहेत. जयगड पंचक्रोशीमध्ये त्यांचा चांगलाच दबदबा आहे. सध्या ते उपसरपंच असून या परिसरात संघटन वाढीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. निवळीचे जठार हे भाजपमध्ये गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. तिघांमध्ये कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यामध्ये बाळ माने यांच्या निकटवर्तीयांची वर्णी लाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, तालुक्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन दोन तालुकाध्यक्ष नियुक्तीबाबतही चर्चा सुरु आहे; मात्र याला वरीष्ठ नेत्यांकडून अजुनही दुजोरा मिळालेला नाही.
शहराध्यक्षपदासाठी तिघांची नावे
रत्नागिरी शहराध्यक्षपदी सचिन करमरकर यांनी चांगले काम केले होते. प्रतिकुल परिस्थितीमध्ये करमरकर यांनी ही कामगिरी केली. आता नव्याने येणार्या शहराध्यक्षापुढे मोठी आव्हाने उभी राहणार आहेत. पक्षाच्या वरीष्ठस्तरावरुन तळागाळात जाण्याचे नियोजन केले जात आहे. सध्या दादा ढेकणे, अमित विलणकर, राजन फळके यांची नावे इच्छुकांमध्ये आहेत.