रत्नागिरी:- आगामी लोकसभा निवडणूक व विधानसभांच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्याकरिता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे येत्या गुरुवारी (ता. १९) रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. ते निवडक ३५० पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून पक्षीय धोरण, कार्यक्रम राबवण्याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ज
िल्हा भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरीत येत आहेत. ते सकाळी एसटी स्टॅंड, जैन मंदिर, राम आळी परिसरातील नागरिक, रहिवाशांशी संवाद साधतील. त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करतील. सकाळी ११ च्या सुमारास माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात ते कार्यकर्त्यांनी संबोधित करतील. निवडणुकीसाठी काय रणनिती आखली पाहिजे याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.
प्रदेशाध्यक्षांच्या स्वागताची तयारी सुरू झाली असून सर्वत्र भाजपाचे झेंडे लावण्यात येणार असून बॅनरही झळकणार आहेत. याकरिता नियोजन करण्यात येत आहे. भाजपासह युवा मोर्चा, महिला मोर्चा यासह सर्व मोर्चांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.