भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेला शेतकऱ्यांची पसंती

जिल्ह्यात 682 हेक्टरवर लागवड; 533 शेतकऱ्यांचा सहभाग 

रत्नागिरी:- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला दिलेल्या 800 हेक्टर उद्दीष्टापैकी 682.15 हेक्टर लागवड करण्यात कृषी विभाग यशस्वी झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील 533 शेतकर्‍यांनी लागवड केली.

राज्याच्या कृषी हवामान क्षेत्रानुकूल असलेल्या फळांच्या व त्यांच्या प्रजातींच्या कलमांच्या तसेच नारळ रोपांच्या लागवडीसाठी अर्थसहाय्य दिले जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत केवळ जॉब कार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जातीजमातीचे शेतकरी फळबाग लागवडीकरिता 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. त्यामुळे राज्यात 80 टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही त्यांच्याकडे जॉबकार्ड नसल्याने ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीकरिता अनुदान मिळण्यास अपात्र ठरत होते. या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाही, अशा शेतकर्‍यांसाठी राज्य शासनाने नवीन राज्यपुरस्कृत फळबाग लागवड योजना सुरु केली आहे.

या योजनेच्या माध्यमातून पीक व पशुधन या बरोबरच फळबागेच्या रुपाने शेतकर्‍यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे शासनास शक्य होणार आहे. शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास व 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्यास देखील सहाय्यभूत ठरणार आहे. त्याचप्रमाणे फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करून काही प्रमाणात हवनामान बदल आणि ऋतू बदलाची दाहकता व तिव्रता सौम्य करण्यास देखील मदत होणार आहे.